पोलादपूर : पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथे निर्माणाधीन असलेल्या ‘नमो उद्यान’ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी भाजपा पोलादपूर शहराध्यक्ष महेश निकम यांनी राज्याचे मंत्री मा. नामदार भरतशेठ गोगावले यांच्याकडे पत्राद्वारे केली.
याबाबतचे निवेदन शहराध्यक्ष महेश निकम यांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांना प्रत्यक्ष दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वराज्याचे प्रेरणास्थान असून, छत्रपती शिवाजीनगरमधील रहिवाशांची ही भावना व मागणी लक्षात घेऊन नमो उद्यान परिसरात त्यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शहराध्यक्ष महेश निकम यांनी केली आहे.
नमो उद्यान हे छत्रपती शिवाजीनगरमधील नागरिकांसाठी महत्त्वाचे विरंगुळ्याचे व पर्यटनस्थळ ठरणार असून, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यास उद्यानाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधिक वाढेल, असे शहराध्यक्ष महेश निकम यांनी निवेदनात नमूद केले.
यावेळी मा.सभापती तथा नगरसेविका सौ. अंकिता महेश निकम उपस्थित होत्या.
या मागणीची सकारात्मक दखल घेत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी नमो उद्यानाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे छत्रपती शिवाजीनगरमधील रहिवाशांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.











