मळद : प्रतिनिधी
मळद गावची कन्या कुमारी मनाली संजय रणवरे-पाटील हिने इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून ‘आर्किटेक्चर अँड कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ या विषयात मास्टर पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मळद गावासह परिसरातील विविध स्तरांतून तिचे तसेच तिच्या माता-पित्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
मनाली ही मळद गावचे उपसरपंच संजय माणिकराव रणवरे-पाटील यांची कन्या आहे. वडिलांची मोठी स्वप्ने आणि स्वतःची जिद्द, मेहनत व इच्छाशक्ती यांच्या जोरावर मनालीने परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेत हे उल्लेखनीय यश संपादन केले.
परदेशात शिक्षण घेत असताना विविध आव्हानांवर मात करत मनालीने आपल्या गुणवत्तेची व कर्तृत्वाची छाप उमटवली. आर्किटेक्चर आणि कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट या महत्त्वपूर्ण क्षेत्रात मास्टर पदवी संपादन करून तिने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर मळद गावाचे नावही उज्ज्वल केले आहे.
मनालीच्या या यशामागे तिच्या माता-पित्यांचे संस्कार, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यांचा मोठा वाटा आहे. मुलीने परदेशात उच्च शिक्षण घेऊन मोठे यश मिळवावे, हे वडील संजय रणवरे-पाटील यांचे स्वप्न होते. मनालीने आपल्या कष्टाने आणि जिद्दीने ते स्वप्न साकार करून दाखवले आहे.
मनालीच्या या यशामुळे मळद गावातील विद्यार्थी व तरुणांसमोर शिक्षण, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर जागतिक स्तरावर यश संपादन करण्याचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
मनाली रणवरे-पाटील हिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मळद गावासह पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर आणि तिच्या माता-पित्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











