प्रतिटन ५० रुपयांच्या कपातीवरून वाद चिघळला; दिलीप वळसे-पाटील आक्रमक, सभेनंतर घोषणाबाजी व ठिय्या आंदोलन
पारगाव प्रतिनिधी :
पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी कारखाना परिसरात पार पडली. कारखान्याचे संस्थापक तथा माजी सहकारमंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रतिटन ५० रुपयांच्या कपातीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले. आरोप-प्रत्यारोप, घोषणाबाजी आणि सभेनंतर झालेल्या ठिय्या आंदोलनामुळे सभा चर्चेचा विषय ठरली.
अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी मागील गळीत हंगामातील कारखान्याच्या कामकाजाचा आढावा सभेसमोर मांडला. अहवाल वाचन सुरू असतानाच कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी प्रतिटन ५० रुपयांच्या कपातीच्या मुद्द्यावर आक्षेप घेत आक्रमक भूमिका मांडली. शिवसेना नेते अरुण गिरे यांनीही या कपातीला विरोध दर्शविला.
यानंतर बोलताना आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. भीमाशंकर कारखान्याला आठ वेळा देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार मिळाल्याचे सांगत, कारखान्याच्या कारभाराबाबत आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले.
“मला दोषी ठरवायला अजून दहा जन्म घ्यावे लागतील,” असे म्हणत वळसे-पाटील यांनी विरोधकांवर टीका केली.
पराग कारखान्याच्या जमीन खरेदीच्या विषयाचा संदर्भ देत त्यांनी देवदत्त निकम यांच्यावरही निशाणा साधला. पराग कारखान्याच्या जमीन खरेदीवेळी निकम स्वतः उपस्थित होते; त्या विषयाचा संबंध भीमाशंकर कारखान्याशी जोडू नये, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
घसारा कमी दाखविल्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक दर देणे शक्य झाल्याचा दावा वळसे-पाटील यांनी केला. निकम अध्यक्ष असतानाच भाग विकास निधीची कपात सुरू झाली होती, मग त्यावेळी आक्षेप का घेतला गेला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “मी बोलायला लागलो तर तुम्हाला पळती भुई थोडी होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
सीबीजी प्रकल्पातून भविष्यात अधिक दराचे आश्वासन
भीमाशंकर कारखान्यात लवकरच सीबीजी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती वळसे-पाटील यांनी दिली. या प्रकल्पामुळे भविष्यात शेतकऱ्यांना अधिक दर देणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अनुदानातून शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातून ऊस उत्पादन वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
कारखान्याची कामगिरी दृष्टिक्षेपात
- एकूण गाळप : ८.८३ लाख टन
- सरासरी साखर उतारा : ११.८९ टक्के
- एकूण साखर उत्पादन : ९.२७ लाख क्विंटल
- शेतकऱ्यांना दिलेला दर : ३५०० रुपये प्रतिटन
- पुढील हंगामाचे उद्दिष्ट : १० लाख टन
एफआरपीपेक्षा अधिक दर दिल्याचा दावा
वळसे-पाटील यांनी घसारा कमी दाखविल्यामुळे एफआरपीच्या ३२७२ रुपयांपेक्षा अधिक दर देणे शक्य झाल्याचा दावा केला. खोडव्याला प्रतिटन ३६०० रुपये दर देण्यात आल्याचे सांगत सभासद आणि बिगरसभासद असा भेदभाव न करता समान दर दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच देवदत्त निकम यांना संचालक आणि अध्यक्षपदावर आणण्यात आपली भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
सभेनंतर घोषणाबाजी; मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या
सभेतील सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी जाहीर केल्यानंतर वातावरण पुन्हा तापले. देवदत्त निकम, अरुण गिरे आणि त्यांच्या समर्थकांनी सभा गुंडाळल्याचा आरोप करत “विषय नामंजूर” अशा घोषणा दिल्या.
त्यानंतर आंदोलकांनी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही काळ ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या उपस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.






