माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
अमरावती : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ ट्रिगर यादीतून वगळण्यात आलेल्या धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यांमध्ये तत्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी धामणगाव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर महिन्यात सोयाबीनच्या शेंगा भरण्याचा आणि कपाशीला बोंड लागण्याचा महत्त्वाचा कालावधी असताना या तीनही तालुक्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासकीय आकडेवारीचा हवाला देत शिष्टमंडळाने सप्टेंबर महिन्यात धामणगाव तालुक्यात सुमारे ६० टक्के, तर चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक पावसाची घट झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या भागात पावसाची मोठी तूट असूनही केवळ सुरुवातीच्या सरासरीच्या तांत्रिक निकषांवर या तीन तालुक्यांना दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेस शिष्टमंडळाने केला.
यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी महसूल मंडळांच्या निकषांऐवजी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तीनही तालुक्यांना एकसंध घटक मानून तत्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी केली. तसेच पीक कापणी प्रयोगांची प्रतीक्षा न करता पिकांच्या संभाव्य नुकसानीचा विचार करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी थेट दुष्काळी अनुदान जमा करावे, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पीक विमा भरपाई देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
यावेळी श्रीकांत गावंडे, गणेश आरेकर, पंकज वानखेडे, समीर दहातोंडे, निवास सूर्यवंशी, बाळासाहेब ठाकरे, सरफराज पठाण, अमोल होले, राजेंद्र रजनेकर, रावसाहेब शेळके, राम मार्डीकर, मनोहर राऊत, शरद घासले, दीपक भागात, मंगेश धावडे, हरिभाऊ गवई, रवी देशमुख, दिगंबर हिरोडे, गोविंदराव देशमुख, दिनेश जगताप, गितेश ठाकूर, संदीप दावेदार, किरण देशमुख, पिंटू कोपरकर, पावन चौधरी, प्रफुल कोकाटे, विनोद चौधरी, प्रमोद इंदलकर, सुधीर पाटेकर, देवानंद खूने, अवी इंगळे, भाऊराव बामनोटे, सुशील थोरात, हनुमान मोदक, सचिन कोल्हे, अतुल ठाकुर, प्रशांत ठाकरे, अशोकराव चौधरी, मंगेश जोगे, मोफिक, ऋषिकेश मुंडे, रमेश ठाकरे, मोरेश्वर दिवटे, अनिस पाठाण, प्रवीण लादे, मनीष जगणे, सक्षम वानखेडे, दीपक सावाई, संजय कुंभलकर, गजानन बडगे आदी उपस्थित होते.






