शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल २ ऑक्टोबर रोजी पेण येथे होणार विशेष गौरव
वार्ताहर :
खोपोली : खालापूर तालुक्यातील जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळा, खोपोली येथील मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांची शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या विशेष योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार’ यासाठी निवड करण्यात आली आहे. आविष्कार फेडरेशन इंडिया यांच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय निवड समितीच्या माध्यमातून त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
आविष्कार फेडरेशन इंडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार श्री. संजय पवार आणि महाराष्ट्र राज्य निवड समिती सदस्य श्री. दिलीप मोरे यांच्या निवड पत्र व सन्मानपत्राद्वारे सौ. समिक्षा ढोके यांची पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे.
हा विशेष गौरव सोहळा शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता आगरी समाज हॉल, चिंचपाडा, पेण, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सौ. समिक्षा ढोके यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम राबवून शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. लहान मुलांना शिक्षण मनोरंजक आणि आनंददायी वाटावे, यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांप्रती प्रेम, माया व आपुलकीची भावना ठेवून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
त्यांच्या कार्यक्षमतेमुळे तसेच शैक्षणिक बाबींमध्ये तत्परता आणि ठाम भूमिका मांडण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांची आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे निवड समितीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या पुरस्कारामुळे जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळा, खोपोलीमधील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा सन्मान संपूर्ण शाळेसाठी अभिमानाची बाब असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान, पुरस्कार वितरण सोहळा वेळेत सुरू होणार असून पुरस्कार स्वीकारताना गौरवमूर्तींनी ब्लेझर जॅकेट परिधान करावे, तसेच सहकुटुंब व्यासपीठावर उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा, अशा सूचना आयोजकांकडून देण्यात आल्या आहेत.
सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, शिक्षक, पदाधिकारी, विद्यार्थी तसेच पत्रकार व शासकीय अधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.











