लहानग्यांनी स्वतः पुढाकार घेत साजरा केला गणेशोत्सव; आरती, चित्रकला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
येवला : येवला तालुक्यातील ठाणगाव येथील बरड वस्ती परिसरातील बालगोपाळांनी स्वतः एकत्र येऊन स्थापन केलेल्या बाल गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाचे उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. मोठ्यांच्या मदतीशिवाय लहान मुलांनी पुढाकार घेऊन साजरा केलेल्या या गणेशोत्सवाचे परिसरात कौतुक होत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून बरड वस्तीतील लहान मुलांनी एकत्र येऊन गणरायाची स्थापना केली होती. दररोज सायंकाळी आरती, लहान मुलांचे विविध खेळ, चित्रकला स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मुलांनी स्वतः केले. त्यामुळे संपूर्ण गणेशोत्सव काळात परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
विसर्जन मिरवणुकीवेळी बालगोपाळांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गुलालाची उधळण, ताशांच्या तालावर नृत्य आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषात लहानग्यांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
या सोहळ्यासाठी गावातील तसेच बरड वस्तीतील नागरिकांनी बालगोपाळांना प्रोत्साहन देतानाच विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरक्षिततेचीही काळजी घेतली. लहान वयातच मुलांमध्ये एकत्र येण्याची वृत्ती, संघटन कौशल्य आणि संस्कृतीची आवड निर्माण होणे महत्त्वाचे असल्याचे गावातील युवा कीर्तनकार अविनाश महाराज शेळके यांनी यावेळी सांगत बालगोपाळांना मार्गदर्शन केले.
यावेळी जनार्धन भवर, जिभाऊ शिरसाठ, योगेश खरे, मारुती पानसरे, अभिषेक भवर, समाधान घुसाळे, संदिप शिरसाठ, वाल्मिक कोंढरे, दिपक घुसाळे, समाधान भवर, किशोर कोंढरे, रवि शेळके, निवृत्ती खरे, बापु घुसाळे, मयुर पानसरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आरती व महाप्रसादाचे वाटप करून या उत्साहपूर्ण गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली.











