विविध गणेश मंडळे एकत्र; सामाजिक एकोपा व बंधुभावाचा दिला संदेश
जळकोट : नगरपंचायत कार्यालय, जळकोट यांच्या वतीने शहरातील सर्व गणेश मंडळे व गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गणेश मंडळांच्या वतीने भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक, सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विसर्जनापूर्वी शहरातील विविध गणेश मंडळांची शेवटची आरती भक्तिमय वातावरणात पार पडली.
यावेळी नगरपंचायतीच्या अध्यक्षा सौ. प्रभावती चंद्रकांत कांबळे, उपाध्यक्ष मन्मथ किडे, सौ. गवळे मॅडम, सौ. घुळशेटे मॅडम, देव शेट्टे, नगरपंचायतचे कर्मचारी व सर्व नगरसेवक उपस्थित होते. तसेच तहसीलदार लाडगे साहेब, पोलीस निरीक्षक माचेवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जळकोट शहरातील बसवकीर्ती गणेश मंडळ, लॉर्ड शिवनेरी गणेश मंडळ, शिव प्रतिष्ठान गणेश मंडळ, युवा गणेश मंडळ, डागेवाडी गणेश मंडळ, केसरी गणेश मंडळ, शिवशक्ती गणेश मंडळ, वीरभद्र गणेश मंडळ, शुभराजे गणेश मंडळ, गौरीपुत्र गणेश मंडळ, साईराम गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ आदी मंडळांनी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला.
या मंडळांच्या वतीने आकर्षक देखावे, भजनी मंडळांचे कार्यक्रम, भारुडे तसेच देशभक्तीपर गीतांचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला.
विसर्जनापूर्वी झालेल्या शेवटच्या आरतीसाठी शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, तरुण मित्रमंडळे, महिला, गणेशभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भक्तिमय वातावरणात गणरायाची आरती करण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषाने जळकोट शहर दुमदुमून गेले.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगरपंचायत प्रशासन, पोलीस विभाग, गृहरक्षक दल, गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांच्या सहकार्याने गणेशोत्सव उत्साहपूर्ण आणि शांततेत पार पडला.
यावेळी विविध प्रसारमाध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणेशोत्सवातील विविध कार्यक्रमांचे वार्तांकन केले.











