राजे शिवाजीनगर गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक संदेश ठरतोय लक्षवेधी
कळंबोली | प्रतिनिधी :
कळंबोली सेक्टर-१ येथील राजे शिवाजीनगर रहिवासी संघाच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाला यंदा सामाजिक संदेशाची प्रभावी किनार लाभली आहे. मंडळाने ‘भेसळ, आपल्या ताटातून आपल्या आयुष्यात’ या विषयावर साकारलेल्या जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’कडून नवी मुंबई-पनवेल विभागातील सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा २०२६ मध्ये उत्कृष्ट देखावा प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या देखाव्याची संकल्पना पंकज सूर्यवंशी यांची आहे.
मंडळाचे यंदा ३९वे वर्ष असून, सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर आधारित जिवंत देखावे सादर करण्याची परंपरा मंडळाने कायम ठेवली आहे. यंदाच्या देखाव्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यावर आधारित प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यात आला आहे.
अधिक नफा मिळविण्यासाठी काही ठिकाणी अन्नपदार्थ, दूध तसेच विविध वस्तूंमध्ये भेसळ केली जाते. अशा भेसळयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भेसळीविरोधात जागरूक राहावे, संशयास्पद भेसळीबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी आणि भेसळीविरोधातील कारवाईला सहकार्य करावे, असा संदेश देखाव्यातून देण्यात आला आहे.
भेसळखोरांविरोधात प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचे महत्त्वही या जिवंत देखाव्यातून अधोरेखित करण्यात आले आहे. ‘भेसळीला आळा घालण्यासाठी प्रशासनाची कठोर भूमिका आणि नागरिकांची जागरूकता आवश्यक आहे,’ असा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
प्रथम पारितोषिक मिळाल्यानंतर हा जिवंत देखावा कळंबोलीतील गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरला आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच राजकीय नेते मंडळाला भेट देऊन देखाव्याची पाहणी करत आहेत. नागरिकही मोठ्या संख्येने देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
सन २००२ पासून जिवंत देखाव्यांची परंपरा सुरू करणाऱ्या कळंबोलीतील प्रमुख गणेश मंडळांपैकी राजे शिवाजीनगर रहिवासी संघ हे एक मंडळ आहे. सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याची ही परंपरा आजही कायम असून, आगामी काळातही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम आणि जनजागृतीपर देखावे सादर करण्याचा मंडळाचा मानस असल्याचे गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष अवधूत साळुंखे यांनी सांगितले.











