मानव विकास बससेवेलाही फटका; रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास विद्यार्थी व ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
मारेगाव, प्रतिनिधी : मारेगाव तालुक्यातील ग्राम नवरगाव, करणवाडी अंतर्गत येणाऱ्या करणवाडी ते गोधनी या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत बससेवा सुरू आहे. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या बससेवेलाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गोधनी येथून विविध शाळांमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज या खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित शाळांतील शिक्षकांनी तसेच नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र अद्यापही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
संबंधित प्रशासनाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही तर विद्यार्थी व गोधनी येथील नागरिकांच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.







