कोळकी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडे दुर्लक्षाचा आरोप; समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा
फलटण : प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील कोळकी ग्रामपंचायत हद्दीतील पत्र्याचा मळा, चैतन्य पार्क परिसरात पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीमार्फत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असला, तरी चैतन्य पार्क परिसरातील पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सध्या कोळकी ग्रामपंचायतीवर प्रशासकाचे राज असल्याने प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी लक्ष्मण पखाले यांच्याकडून नागरिकांशी उद्धटपणे वागणूक मिळत असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
दरम्यान, ग्रामविस्तार अधिकारी राहुल कदम यांनी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना समज देऊन चैतन्य पार्क व पत्र्याचा मळा परिसरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविण्यात यावी, अन्यथा कोळकी ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी अक्षय गव्हाचे यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
चैतन्य पार्क परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवून नागरिकांना नियमित व सुरळीत पाणी मिळावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




