डीपीवरील फ्युज बॉक्स तात्काळ बंदिस्त करण्याची मागणी; दुर्लक्ष झाल्यास वीज वितरण कार्यालयावर मोर्चाचा इशारा
खटाव प्रतिनिधी :
खटाव तालुक्यातील निमसोड परिसरातील विविध गावांमध्ये तसेच वाडी-वस्त्यांवरील वीज वितरण कंपनीच्या डीपीवरील फ्युज बॉक्सचे दरवाजे नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उघडे फ्युज बॉक्स लहान मुले तसेच परिसरात वावरणाऱ्या जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतात. विशेषतः पावसाळ्यात या धोक्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी वीज वितरण कंपनीने निमसोड परिसरातील सर्व डीपीवरील फ्युज बॉक्सची तपासणी करून ते तात्काळ बंदिस्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संभाव्य दुर्घटनेसाठी प्रशासन व वीज वितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
याबाबत निमसोड ग्रामस्थांच्या वतीने वीज वितरण कार्यालयाला निवेदन देण्यात येणार असून, प्रत्येक वाडी-वस्तीवरील डीपीची पाहणी करून आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येणार आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास निमसोड ग्रामस्थांसह महिला व पुरुष नागरिकांच्या वतीने वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.






