भव्य आरोग्य तपासणी शिबिरासह मोफत औषध वाटप; कीर्तन, बालकलाकारांचे नृत्य, खेळ व महाप्रसादाचे आयोजन
बोरफळ : प्रतिनिधी
बोरफळ येथील विघ्नहर्ता सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात लातूर येथील तज्ज्ञ डॉक्टर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बेलकुंड येथील आरोग्य अधिकारी डॉ. हत्ते सर यांच्या टीमने नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यावेळी गरजू नागरिकांना मोफत गोळ्या व औषध उपलब्ध करून देण्यात आली.
यासोबतच ह.भ.प. शिवम महाराज कठारे भादेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. लहान मुलांच्या नृत्याचा कार्यक्रम, विविध बालखेळ, आराधी मंडळाच्या गीतांचा कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्यात आल्याने नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तालुक्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांमध्ये विघ्नहर्ता सार्वजनिक गणेश मंडळाचा उपक्रम उल्लेखनीय ठरला. या कार्यक्रमाचे आयोजक पै. यशोदीप भैया पाटील, अध्यक्ष बालाजी राजेंद्र यादव, उपाध्यक्ष सावन सूर्यवंशी, सचिव प्रथमेश सुगवे तसेच सर्व सदस्य व कार्यकारिणी मंडळाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.






