आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते सेविकांचा गौरव; गोगापूर विद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन
गोगापूर : प्रतिनिधी
सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत माध्यमिक विद्यालय, गोगापूर येथे विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका व त्यांच्या पर्यवेक्षक महिला भगिनींचा आमदार राजेशजी पाडवी यांच्या हस्ते साडी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत आमदार पाडवी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
याच अभियानांतर्गत विद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी साकारलेल्या विविध रांगोळ्यांचे आमदार राजेशदादा पाडवी यांनी स्वतः निरीक्षण करून विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास पूज्य साने विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक मकरंदभाई पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री धारेश्वर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब आर. डी. पाटील, उपाध्यक्ष काशिनाथआण्णा पाटील, संचालक मंडळ, परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री धारेश्वर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव जयदेवभाई पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. आर. पटेल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.






