१९७३ पासून गणेशमूर्ती विसर्जनाची सेवा; स्वयंसेवकांकडून सलग १४ तास पाण्यात राहून सेवा
मुंबई कांदिवली पश्चिम :प्रतिनिधी
कांदिवली पश्चिम गावठाण येथील तलावावर गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी यंग स्टार क्रीडा मंडळाच्या स्वयंसेवकांकडून करण्यात येणारे विसर्जन कार्य कौतुकास्पद असल्याचे दिसून आले. विविध आकारांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र सेवा देत आहेत.
मंडळाचे सचिव नरेंद्र मुन्वाचार्य यांनी सांगितले की, १९७३ पासून स्वयंसेवकांच्या माध्यमातून गणेशमूर्ती विसर्जनाचे काम केले जात आहे. या तलावात एक इंचापासून ते २१ फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. स्वयंसेवक सलग १४ तास पाण्यात राहून विसर्जन कार्यात सहभागी होतात. स्वयंसेवकांसाठी बनियन, चड्डी, चहा-नाश्ता, जेवण तसेच परिसरातील विद्युत रोषणाई व स्टेज आदींसाठी दरवर्षी सुमारे चार ते साडेचार लाख रुपये खर्च येतो.
या कार्यासाठी मुंबई महापालिकेच्या आर दक्षिण विभाग, पोलीस ठाणे किंवा इतर कोणत्याही संस्था-संघटनेकडून आर्थिक मदत मिळत नसून केवळ सहकार्य मिळते, असे मुन्वाचार्य यांनी सांगितले. कोरोना काळात मंडळाच्या वतीने गरजू नागरिकांना धान्याचे वाटपही करण्यात आले होते. विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश मंडळांकडून नियमानुसार रक्कम स्वीकारून त्याची पावती दिली जाते. याबाबत काही मंडळांनी हरकत घेतली असता त्यांना माहिती देऊन गैरसमज दूर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






