‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने रिसोड शहर दुमदुमले; सामाजिक व धार्मिक देखाव्यांनी मिरवणुकीत रंगत
रिसोड : प्रतिनिधी –
रिसोड शहरात गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात तसेच ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
विसर्जन मिरवणुकीत महिला, युवक, बालकांसह ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध गणेश मंडळांनी साकारलेले सामाजिक, धार्मिक आणि जनजागृतीपर देखावे नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले. काही मंडळांच्या वाहनांवरील आकर्षक सजावट, पारंपरिक वेशभूषेतील बालकांचा सहभाग तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी मिरवणुकीला विशेष रंगत आणली.
या मिरवणुकीत संकटमोचन गणेश मंडळ, संत सावतामळी गणेश मंडळ, महात्मा फुले गणेश मंडळ, आप्पास्वामी गणेश मंडळ यांसह विविध गणेश मंडळांनी सहभाग घेतला.
गणेशभक्तांसाठी शहरातील विविध ठिकाणी नागरिक व गणेश मंडळांच्या वतीने खिचडी, चहा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान थकलेल्या भक्तांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळाला. विविध सेवाभावी उपक्रमांतून नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सवाची सांगता केली.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. उत्साह, श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत रिसोडकरांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.





