माहूर तहसील कार्यालयासमोर अनिल राठोड व शेख नईम यांचे आंदोलन; न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार
माहूर : प्रतिनिधी
लकी ड्रॉमध्ये मिळालेले गाळे परत मिळावेत आणि झालेला अन्याय दूर करून न्याय मिळावा, या मागणीसाठी अनिल बंडू राठोड व शेख नईम शेख इसाक यांनी सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी माहूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाचा हा दुसरा टप्पा असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
यापूर्वी दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण केले होते. त्यावेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडून पत्र मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, मागण्यांची पूर्तता न झाल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, श्री रेणुकादेवी संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या तात्पुरत्या व्यापारी संकुलातील लकी ड्रॉमध्ये मिळालेले गाळे संबंधितांना परत देण्यात यावेत. गाळा क्रमांक २३ अनिल बंडू राठोड व गाळा क्रमांक ११ शेख नईम शेख इसाक यांचा ताबा त्यांना परत मिळावा, अशी प्रमुख मागणी आहे.
सन २००९ पासून व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या आपल्यावर झालेला अन्याय दूर करावा, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिक्रमणधारकांच्या यादीत व पंचनाम्यात नावे असतानाही गाळे इतर व्यक्तींना देण्यात आल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे माहूर तहसील कार्यालय परिसरात प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, पुढील कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









