नोटीसीवरील दिनांक व वेळेनुसार जुन्या नगरपरिषद मंगल कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन; नाव गहाळ झालेल्यांनी फॉर्म ६ भरावा
प्रतिनिधी :
शिरूर : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत १९८ शिरूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीबाबत सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. ज्या नागरिकांना शिरूर नगरपरिषदेच्या माध्यमातून नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी नोटीसीवर नमूद केलेल्या दिनांक व वेळेनुसार आवश्यक कागदपत्रांसह जुन्या नगरपरिषद मंगल कार्यालयात सुनावणीस उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांनी केले आहे.
नोटीसमध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे नागरिकांनी सोबत आणावीत. तसेच शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनीही नोटीस प्राप्त झालेल्या नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे.
SIR प्रक्रियेनंतर नाव गहाळ झाल्यास फॉर्म ६ भरा
पूर्वीच्या मतदार यादीत नाव असलेल्या, मात्र SIR प्रक्रियेनंतर सध्याच्या मतदार यादीत नाव गहाळ झाले असून सुनावणीची नोटीस मिळालेली नाही, अशा नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ भरावा. संबंधित नागरिकांनी आपल्या प्रभागातील BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. फॉर्म ६ ऑनलाइन पद्धतीनेही भरता येतो.
दावे-हरकतींच्या मुदतीची नोंद घ्या
दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर २०२६, तर दावे, हरकती व नोटिसांचा निपटारा करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२६ आहे. नागरिकांनी आपले नाव सध्याच्या मतदार यादीत आहे की नाही, याची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी.
नाव गहाळ असल्यास संबंधित BLOशी संपर्क साधून फॉर्म क्रमांक ६ भरावा किंवा ऑनलाइन अर्ज करावा. नागरिकांनी निर्धारित मुदतींची नोंद घेऊन वेळेत कार्यवाही करण्याचे आवाहन नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे व मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी केले आहे.








