ग्रामस्थांच्या उपक्रमामुळे वाहतुकीला दिलासा; कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी
पालघर प्रतिनिधी –
मोखाडा : तालुक्यातील पुलाचीवाडी ते धोंडमाऱ्यांचीमेट या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली होती.
रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत ‘आई गावदेवी फायटर’च्या माध्यमातून श्रमदानातून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन माती, खडी व इतर साहित्याच्या साहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले.
या श्रमदानामुळे या मार्गावरील वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, संबंधित प्रशासनाने रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी डागडुजी व मजबुतीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.








