हजारो भाविकांची उपस्थिती; पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि जलसंवर्धनाचा संदेश
माळाकोली | वार्ताहर : ओमकार जाधव : जगद्गुरु श्रीमद् नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश घेऊन निघालेल्या पालखीचे माळाकोली नगरीत उत्साहात स्वागत करण्यात आले. दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पालखीचे माळाकोली येथे आगमन झाले.
पालखीच्या आगमनाची माहिती मिळताच माळाकोलीसह परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पादुकांचे दर्शन घेत भाविकांनी भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले. यावेळी संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
भाविकांसाठी आरती तसेच महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. पालखीच्या माध्यमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पर्यावरणाचे रक्षण करा’ आणि ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ असे पर्यावरण व जलसंवर्धनाचे संदेश देण्यात आले.
माळाकोली येथील कार्यक्रमानंतर पालखी माळेगावच्या दिशेने रवाना झाली. यावेळी ‘गणी गण गणांत बोते’ या मंत्रघोषात भाविकांनी पालखीला निरोप दिला. संतांच्या विचारांचा आणि सामाजिक संदेशांचा प्रसार करणाऱ्या या उपक्रमामुळे माळाकोली परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.









