१५ विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध विषयांवरील पोस्टर व मॉडेल सादरीकरणातून संशोधन व नवोपक्रमाला चालना
विहामांडवा, दि. २९ (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत विहामांडवा येथील आर.वाय.पी. कला महाविद्यालयातील एकूण १५ विद्यार्थ्यांनी सहभागी होत विविध विषयांवरील पोस्टर व मॉडेल सादरीकरणातून उत्कृष्ट प्रदर्शन केले.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, नवनवीन संकल्पना व नवोपक्रमांना चालना मिळावी आणि विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. दि. २९ सप्टेंबर रोजी एम.आय.टी. महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे ही जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली.
बादशाह अंजुमन इशाते-ए-तालीम शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सलमा सय्यद जाकेर तसेच स्थानिक निवड समितीचे अध्यक्ष जाकेर सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर गीरे यांचेही अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन व सहकार्य लाभत आहे.
आविष्कार स्पर्धेचे समन्वयक डॉ. संजय सुदाम शिंदे यांनी अथक परिश्रम घेत १५ विद्यार्थ्यांचा संघ तयार करून स्पर्धेत सहभागी करून घेतला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील पोस्टर आणि मॉडेल सादर करून आपल्या कल्पकतेचे व संशोधनवृत्तीचे दर्शन घडविले.
या स्पर्धेत कु. पूजा डिक्कर, कु. मनिषा भोसले, कु. नम्रता मोरे, कु. प्रिया दळवी, कु. अंजली तांबे, कु. माया दळवे, कु. ऋतुजा उरूणकर, परवेज शेख, ऋषिकेश सोहळे, संदीप पालवे आदी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर पोस्टर व मॉडेल प्रकारात सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय सहभागाबद्दल प्राचार्य डॉ. सुधाकर गीरे, डॉ. अजय बढे, प्रा. विकास बेळगे, प्रा. दत्ता साबळे, डॉ. चंद्रकांत जोगदंड, गणेश करंगळ, दिनेश ससाणे, फेरोज सय्यद, शरीफ शेख, ओम नवपुते, फारूख शेख तसेच पालकवर्ग यांनी समन्वयक डॉ. संजय शिंदे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.






