स्वच्छ दूध उत्पादन व हुमणी किडीच्या एकात्मिक नियंत्रणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; १२५ शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
वालखेडा, ता. शिंदखेडा, दि. १ ऑक्टोबर : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), धुळे सन २०२६-२७ अंतर्गत मौजे वालखेडा, ता. शिंदखेडा, जि. धुळे येथे गुरुवार, दि. १ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमास परिसरातील एकूण १२५ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रकल्प संचालक आत्मा, धुळे श्री. सुरज जगताप व प्रकल्प उपसंचालक श्रीमती प्रज्ञा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृषि विज्ञान केंद्र, धुळे येथील तज्ज्ञ डॉ. पंकज पाटील व डॉ. धनराज चौधरी यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता नोंदणी व स्वागताने झाली. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा श्री. संदीप पवार यांनी प्रास्ताविक करून आत्मा योजनेची माहिती दिली.
तांत्रिक सत्रात डॉ. धनराज चौधरी यांनी स्वच्छ दूध उत्पादनासाठी पशुधनाची योग्य निगा, गोठ्याची स्वच्छता तसेच दूध काढण्याच्या शास्त्रीय पद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. पंकज पाटील यांनी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जैविक व रासायनिक एकात्मिक नियंत्रण पद्धतींची माहिती दिली.
दुपारच्या सत्रात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद, प्रगतिशील शेतकऱ्यांचे अनुभव कथन तसेच शंका-समाधान सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), धुळे व तालुका कृषि अधिकारी कार्यालय, शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. किरण देसले यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषिसखी व सीआरपी यांनी विशेष परिश्रम घेतले.










