पावसाच्या खंडामुळे उत्पादनात मोठी घट; हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी
पातूर प्रतिनिधी : पातूर तालुक्यातील आलेगाव-सावरगाव शिवारात यंदा सोयाबीन पिकाला पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला असून, काही शेतांमध्ये एकरी केवळ ७० किलो ते एक क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पेरणीपासून काढणीपर्यंत झालेला खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे.
पावसाने सलग सुमारे ९० दिवस खंड दिल्याने सोयाबीन पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोयाबीनची काढणी, मळणी आणि बाजारात नेण्याचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे.
शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना अद्याप ठोस मदत मिळालेली नसल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
उत्पादनातील मोठी घट आणि वाढता शेती खर्च लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे.










