ग्रामपंचायतीने तातडीने पथदिवे सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी
मारे, प्रतिनिधी: मारेगाव तालुक्यातील चिंचोली-बोटोनी सर्कलमधील खडकी बुरांडा गावातील पथदिवे अनेक ठिकाणी बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गाव मारेगाव-यवतमाळ महामार्गापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असून, महामार्गावरून गावाकडे येणाऱ्या नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
सायंकाळी उशिरा घरी परतणारे नागरिक, शाळकरी विद्यार्थी, मजूर तसेच इतर ग्रामस्थांना अंधारामुळे त्रास सहन करावा लागत आहे. काही काळापूर्वी राणा नुरजहा सिद्दिकी यांनी नागरिकांच्या सोयीसाठी स्वखर्चातून महामार्गापासून गावापर्यंत विद्युत खांब उभारून त्यावर पथदिव्यांची व्यवस्था केली होती. त्यानंतर या पथदिव्यांची देखभाल व जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आली.
मात्र सध्या या मार्गावरील काही पथदिवे बंद अवस्थेत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर ग्रामपंचायतीला पथदिव्यांच्या वीज बिलाचा खर्च अधिक येत असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी या मार्गावर पुरेसा प्रकाश असणे आवश्यक असल्याने ग्रामपंचायतीने पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करून बंद दिवे सुरू करावेत, अशी मागणी खडकी बुरांडा येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. पथदिवे नियमित सुरू राहतील, यासाठी ग्रामपंचायतीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशीही मागणी होत आहे.








