दुष्काळी कामातून उभारलेल्या प्रकल्पाने श्रीगोंद्याच्या शेतीला दिले बळ; आज दुष्काळाच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी ठरतोय महत्त्वाचा आधार
श्रीगोंदा : प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर तलाव हा केवळ जलसाठा नसून ब्रिटिशकालीन अभियांत्रिकी, हजारो हातांचा परिश्रम आणि दुष्काळाशी लढण्याच्या प्रयत्नांचा ऐतिहासिक साक्षीदार आहे. विसापूर तलावाच्या दर्शनी भागात लावण्यात आलेल्या माहिती फलकावरील नोंदीनुसार, या प्रकल्पाची सुरुवात १८९६ ते १९०० या कालखंडातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती.
दुष्काळी कामातून प्रकल्पाची सुरुवात
स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच भविष्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सरकारने हे काम ‘दुष्काळी काम’ म्हणून हाती घेतले. पुढील काळात या प्रकल्पाच्या उभारणीसाठी विविध कामगार तुकड्यांचा वापर करण्यात आला.
माहिती फलकानुसार, १९०१ ते १९२७ या कालावधीत ‘डेक्कन कॉन्व्हिक्ट गँग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कैद्यांच्या तुकडीने धरणाच्या बांधकामात काम केले. तसेच १९१६ ते १९२३ या काळात ‘हूर क्रिमिनल ट्राइब’ म्हणून तत्कालीन नोंदींमध्ये उल्लेख असलेल्या लोकांनाही कामावर लावण्यात आले होते. अखेर जून १९२७ मध्ये धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
१९२७ मध्ये पहिला ओव्हरफ्लो
धरण पूर्ण झाल्यानंतर १९२७ च्या पहिल्याच पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरला आणि सांडव्यातून पाण्याचा पहिला विसर्ग झाला. त्यानंतर १९२९ मध्ये कालवे व वितरिकांचे काम पूर्ण झाले. २६ ऑगस्ट १९२९ रोजी तत्कालीन बॉम्बे स्टेटचे गव्हर्नर सर फ्रेडरिक ह्यू सुकेस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
भव्य अभियांत्रिकी रचना
माहिती फलकावरील माहितीनुसार, विसापूर प्रकल्पाच्या मुख्य धरणासाठी सुमारे २१ लाख रुपये, तर कालवे व वितरिकांसाठी १९ लाख रुपये खर्च झाला. प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ४० लाख रुपये होता.
धरणाचे पाणलोट क्षेत्र १५९ चौरस मैल असून मुख्य मातीच्या धरणाची लांबी ७,४४० फूट आणि कमाल उंची ८४ फूट आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता १,२३८ दशलक्ष घनफूट असल्याची नोंद माहिती फलकावर आहे.
कालव्यांच्या माध्यमातून शेतीला पाणी
शेतशिवारापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी ११.५ मैल लांबीचा मुख्य कालवा आणि सुमारे ३५ मैल लांबीच्या वितरिका व लहान कालव्यांचे जाळे उभारण्यात आले. कालव्याच्या मुखाशी कमाल ११० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्याची क्षमता असल्याचे नमूद आहे.
या प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र सुमारे ९५ हजार एकर असून, त्यापैकी २६ हजार एकर क्षेत्र सिंचनयोग्य आहे. प्रत्यक्ष तलावाच्या माध्यमातून सुमारे १३ हजार एकर जमीन सिंचनाखाली आणण्याची क्षमता असल्याची माहिती फलकावर देण्यात आली आहे.
दुष्काळाच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा आधार
आजही विसापूर तलावाची उपयुक्तता कायम आहे. श्रीगोंदा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तलावातील उपलब्ध पाणीसाठ्याचे महत्त्व वाढले आहे. सद्यस्थितीत उपलब्ध शिल्लक पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने वापरण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे कालव्यांद्वारे शेतीसाठी पाणी देण्याऐवजी टंचाईच्या काळात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यास प्राधान्य दिले जात आहे.
शतकाहून अधिक काळाचा इतिहास, वैशिष्ट्यपूर्ण अभियांत्रिकी आणि आजही कायम असलेली उपयुक्तता यामुळे विसापूर तलाव हा श्रीगोंदा तालुक्याच्या जलव्यवस्थेतील महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा ठरला आहे.










