शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधला संवाद; समस्या जाणून घेत प्रशासनाला तत्परतेच्या सूचना
भोकरदन प्रतिनिधी : जालना जिल्हा दौऱ्यादरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथे भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष बांधावर जाऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतीची सद्यस्थिती आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या विविध समस्या महसूल मंत्र्यांसमोर मांडल्या. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत, दिलासा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्य करावे, अशा सूचना बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या कठीण परिस्थितीत शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी हिताला शासनाचे प्राधान्य असून, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक मदत व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा पांडे, पत्रकार बांधव तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









