इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत वर्ग, मात्र कायमस्वरूपी शिक्षक केवळ ५; वसतिगृहातील सुविधांचाही अभाव
तालुका प्रतिनिधी : सुगत उराडे
जांबिया, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली | दि. ७ ऑक्टोबर २०२६
ग्रामपंचायत जांबिया अंतर्गत येणाऱ्या टिटोला, पामजीगुडा, झारेवाडा, जांबिया, मोडास्के, पुस्के, गट्टगुडा आणि अडंगे या आठ गावांच्या संयुक्त पारंपारिक ग्रामसभेने बुधवारी (दि. ७) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, जांबिया येथे अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेतील शिक्षकांची कमतरता तसेच वसतिगृहातील विविध सुविधांचा अभाव असल्याचे ग्रामसभेच्या निदर्शनास आले.
१ ली ते १२ वीपर्यंत वर्ग; शिक्षक मात्र केवळ ५
शाळेत इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू असून, कायमस्वरूपी शिक्षकांची संख्या केवळ पाच असल्याचे ग्रामसभेने सांगितले. इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंत एकही कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याचा दावा ग्रामसभेने केला. विद्यार्थ्यांना वाचनाचीही पुरेशी गती नसल्याचे पाहणीत आढळून आल्याचे ग्रामसभेने नमूद केले.
इयत्ता ८ वी ते १० वीकरिता केवळ तीन शिक्षक, तर इयत्ता ११ वी ते १२ वीकरिता दोन शिक्षक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. शिक्षकांची अपुरी संख्या असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, त्याचा परिणाम शाळेच्या पटसंख्येवरही होत असल्याचे ग्रामसभेने म्हटले आहे.
वसतिगृहातील सुविधांबाबतही प्रश्नचिन्ह
शाळेच्या मुलींच्या वसतिगृहाला अधीक्षिका, तर मुलांच्या वसतिगृहाला अधीक्षक नसल्याचे ग्रामसभेने निदर्शनास आणले. मुलींच्या वसतिगृहात गाद्यांचा अभाव असून, पंखे बंद आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या असल्याचे ग्रामसभेने सांगितले.
मुलांच्या वसतिगृहात शौचालयांची कमतरता असून, डबल बेडची व्यवस्था असल्याने टेबल फॅनची आवश्यकता असल्याचेही ग्रामसभेने नमूद केले.
आठ गावांची तातडीने शिक्षक नियुक्तीची मागणी
शाळेतील शैक्षणिक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आठ गावांच्या संयुक्त ग्रामसभेने तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये ७ प्राथमिक शिक्षक, २ माध्यमिक शिक्षक आणि २ ज्युनियर कॉलेज शिक्षक, तसेच १ अधीक्षक व १ अधीक्षिका, अशा एकूण आवश्यक मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे.
आठ दिवसांत नियुक्ती न झाल्यास धरणे आंदोलन
शिक्षकांची नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करत ग्रामसभेने प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास आठही गावांतील नागरिक एकत्र येऊन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संयुक्त पारंपारिक ग्रामसभेने दिला आहे.
— आठ गावांची संयुक्त पारंपारिक ग्रामसभा, जांबिया पंचायत क्षेत्र









