गायरानातील ८० एकरांवर सामाजिक वनीकरणातून उभे राहिलेले वृक्ष स्वार्थासाठी तोडल्याचा आरोप; ‘वृक्षारोपणावर कोट्यवधी खर्च, मग झाडे जगवणार कोण?’ नागरिकांचा संतप्त सवाल
मुचंडी ते कोटलगी रस्त्यालगत तसेच मुचंडी गावातील गायरान परिसरात अनेक वर्षांपासून उभी असलेली भलीमोठी जुनी झाडे तोडली जात असल्याने नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत मुचंडी गावातील गायरानातील सुमारे ८० एकर जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. या वृक्षारोपणातून काळाच्या ओघात मोठी झाडे उभी राहिली. मात्र, याच झाडांपैकी काही भलीमोठी झाडे अज्ञात व्यक्तींकडून स्वार्थासाठी तोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
एकीकडे शासनाकडून दरवर्षी वृक्षारोपणासाठी लाखो-कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘एक झाड आईच्या नावाने’ यांसारख्या अभियानांतून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाते. वृक्षारोपणाचे कार्यक्रम, जनजागृती आणि संगोपनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, ३०–३५ वर्षे संगोपन होऊन मोठी झालेली झाडे जर काही लोक आपल्या स्वार्थासाठी तोडत असतील, तर वृक्षारोपण मोहिमेचा नेमका फायदा काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
रोप लावायला काही मिनिटे; मोठे झाड होण्यासाठी दशके!
एखादे रोप लावणे सोपे असले तरी त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. या जुन्या वृक्षांमुळे परिसरातील तापमान नियंत्रणात राहते, सावली मिळते, मातीची धूप रोखली जाते तसेच पक्षी व अन्य जीवांना अधिवास मिळतो. त्यामुळे अशा जुन्या वृक्षांची कत्तल ही केवळ झाडांची तोड नसून पर्यावरणाच्या दृष्टीनेही गंभीर बाब असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
वृक्षतोडीची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
मुचंडी गावातील गायरान क्षेत्रात सामाजिक वनीकरणातून उभ्या राहिलेल्या झाडांपैकी किती झाडे तोडण्यात आली, ती कोणाच्या मालकीची अथवा ताब्यातील होती, वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली होती का आणि झाडे नेमकी कोणत्या कारणासाठी तोडण्यात आली, याची संबंधित वन विभाग व प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मुचंडी–कोटलगी रस्त्यालगतची तसेच गायरानातील जुनी झाडे वाचविण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. अनधिकृत वृक्षतोड आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी आणि भविष्यातील विकासकामांमध्ये जुन्या वृक्षांचे जतन करण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.
‘झाडे लावा’ असे सांगण्यापेक्षा आधी लावलेली झाडे जगवा आणि ३०–३५ वर्षांनी मोठी झालेली झाडे वाचवा; अन्यथा वृक्षारोपणाच्या नावाने होणारा खर्च केवळ कागदावरच राहणार नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.








