/ प्रतिनिधी गणेश शेळके
डोणगाव दि. 7 :
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि अल्प पावसाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांमधील नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी आगामी दसऱ्याच्या सणापूर्वी रेशन दुकानांमधून आनंदाचा शिधा वितरित करण्यात यावा अशी जोरदार मागणी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी व विविध सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. गेल्या काही कळत राज्यात अनेक भागांत पावसाची अनिश्चितता आणि दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी व सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत सण-उत्सव आनंदाने साजरी करता यावेत यासाठी शासनाने
गरिबांना सवलतीच्या दरात शिधा जिन्नस उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणी जिल्हा काँग्रेसचे शैलेश सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात नवरात्र व दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रेशन दुकानांवर आनंदाचा शिधा एक वेळेत पोहोचवण्यात यावे. व वितरित करण्यात येणाऱ्या शिध्यातील रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल यासारख्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असाव्यात. तसेच वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखून पात्र लाभार्थ्यापर्यंतच हा शिधा पोहोचेल याची दक्षता अन्न व नागरी पुरवठा विभागाने घ्यावी. तसेच दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांची आर्थिक ओढाताण लक्षात घेता सरकारने या मागणीचा तात्काळ विचार करून याबाबतचा शासन निर्णय लवकरात लवकर जारी करावा, अशी अपेक्षा शैलेश सावजी यांनी व्यक्त केली आहे.








