डोणगाव, गणेश शेळके (प्रतिनिधी)
सिंदखेड राजा तालुक्यामधील साखरखेर्डा व खामगाव तालुक्यातील लाखनवाडा हे दोन अपर तहसील होणार असल्याचे आदेश २२ सप्टेंबर रोजी आले. मात्र, या शासन आदेशानुसार फक्त तीन अपर तहसीलचा प्रश्न मिटला खामगाव आणि डोणगावचा प्रश्न कायमच आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असणारे डोणगाव मंडळ हे भौगोलिक दृष्ट्या मोठे असून आजूबाजूला असणाऱ्या शेलगाव देशमुख सारख्या मंडळांना तहसीलच्या कामानिमित्त मेहकरला जावे लागते. ४० ते ४५ किमीचा फेरफटका मारावा लागतो. याचा विचार आणि सदर ठिकाणी
होणारी गर्दी पाहता डोणगाव येथे अपर तहसील कार्यालयाची मागणी समोर आली. नव्हेतर तसा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठविण्यात आला. यावर गेल्या काळात हरकती घेण्यात आल्या. डोणगाव अपर तहसीलमध्ये साखरखेर्डा अपर तहसील प्रमाणेच जर डोणगाव व शेलगाव देशमुख हे दोन मंडळे जोडण्यात आली, तर निश्चितच ग्रामीण जनतेच्या समस्यांचे निवारण होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून सिंखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, मेहकर तालुक्यातील डोणगाव व खामगाव तालुक्यातील लाखनवाडा या ठिकाणी होणाऱ्या अपर तहसीलचा कामकाज चालवण्यासाठी आकृतीबंध तयार करण्यात आला. गट ‘अ’
संवर्गातील तहसीलदार, गट ‘ब’ संवर्गातील नायब तहसीलदार, गट ‘क’ संवर्गातील सहाय्य्क महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक व वाहन चालक, अशी पदे नव्याने भरती करण्याचे ठरल्याने डोणगाव अपर तहसीलचा प्रश्न मिटणार असे वाटतं असतांनाच २२ सप्टेंबर रोजी केवळ लाखनवाडा व साखरखेर्डा हे दोनच अपर तहसील कार्यान्वित करण्याचे आदेश आले. त्यामुळे जनतेची चांगलीच निराशा झाली आहे. त्यामुळे डोणगाव अपर तहसीलसाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारे, लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी यासंदर्भात पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याशिवाय डोणगाव अपर तहसीलचा प्रश्न सुटणार नाही, एवढे मात्र खरे !








