पातूर-बाळापूर महामार्गावरील अपघात; गंभीर जखमी
युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
प्रमोद डोंगरे
तालुका प्रतिनीधी पातुर
पातूर-बाळापूर महामार्गावर देऊळगाव जवळ मंगळवारी (६ ऑक्टोबर) रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास ट्रक आणि मोटारसायकलची आमने-सामने जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात मोटारसायकलस्वार गौरव संतोष बडकर (वय २२ वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव संतोष बडकर हा मोटारसायकल क्रमांक एमएच ३० बीव्ही ४९६३ वरून प्रवास करीत होता. देऊळगाव जवळ पातूर-बाळापूर महामार्गावर त्याच्या मोटारसायकलची समोरून येणाऱ्या ट्रकसोबत जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, युवक गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. जखमी गौरव याला तातडीने पातूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातामुळे पातूर-बाळापूर महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून, वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने महामार्गावरील धोकादायक ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अपघाताची नेमकी कारणे तसेच ट्रकचालकाची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. घटनेमुळे बडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, २२ वर्षीय युवकाच्या अकाली मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.







