अवैध प्रवेश शुल्कासाठी विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याच्या धमक्या; पालकांकडून चौकशीची मागणी
प्रमोद डोंगरे तालुका प्रतिनीधी पातुर
पातूर : पातूर तालुक्यातील काही खाजगी शाळांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी शासनाच्या माध्यमातून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत एकूण सहा फेऱ्या घेण्यात आल्या असून, या फेऱ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश मिळाला, त्यांच्याकडून आता शाळा प्रशासनाकडून १० ते १५ हजार रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क किंवा इतर शुल्काची मागणी केली जात असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, मागितलेली रक्कम न भरल्यास प्रवेश रद्द केला जाईल अथवा विद्यार्थ्याला शाळेतून काढण्यात येईल, अशा प्रकारच्या धमक्या काही विद्यार्थ्यांना व पालकांना दिल्या जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या कुटुंबांसमोर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळाल्यानंतर अशा प्रकारे अतिरिक्त रकमेची मागणी करण्यामागे नेमके कोणते नियम आहेत, तसेच ही रक्कम अधिकृत आहे की अनधिकृत, याबाबत शिक्षण विभागाने स्पष्टता देणे गरजेचे आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संबंधित शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थी व पालकांना स्पष्ट मार्गदर्शन करणारी अधिसूचना जारी करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
या प्रकरणात शिक्षण विभाग नेमकी कोणती भूमिका घेतो आणि संबंधित शाळांवर चौकशी अथवा कारवाई होते का, याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.






