कवठे महांकाळ: (दि. ८ )- (विलास उत्तम लोखंडे)
येथील शिक्षण प्रसारक संस्थेचे पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त’ विशेष व्याख्यान आयोजित केले होते.तसेच मराठी विभाग आणि ग्रंथालय व माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार ३ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस व ३ ते ९ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. याचेच औचित्य साधून मराठी विभागात पीडीव्हीपी महाविद्यालय तासगाव येथील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.शहाजी पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, मराठीचा उगम वेदांपासून सुरू होतो. कारण ज्ञानेश्वरांनी वेदांतील हेच ज्ञान मराठीत आणले.तसेच अभिजात मराठी भाषा सप्ताहा निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शनाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात भारतीय ज्ञान परंपरेतील वेद, उपनिषदे, मराठीच्या अभिजाततेचा २००० वर्षांपूर्वीचा पुरावा असलेला गाथा सप्तशती ग्रंथ, ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, दासबोध, तुकाराम गाथा यासह संत साहित्याची दुर्मिळ पुस्तके, ताम्रपट व हस्तलिखितांच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.डी. कोरे, प्रा. विजय कोष्टी,प्रा.डॉ. दिलीप गाडे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. कोरे यांनी एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळतो हे सांगून मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगितली. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ. सरस्वती अंदेलवार व ग्रंथपाल महेश कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.अर्जुन राठोड यांनी केले. याप्रसंगी डॉ. सुजाता सोलगे, डॉ.किरण सकट, डॉ.सुरेंद्रनाथ बाबर, प्रा.रामदास वसावे, प्रा. निशिकांत वाघमारे उपस्थित होते. वनिता साळुंखे ,पद्माकर सपकाळ,गोविंद शिंदे यांनी ग्रंथ मांडणी साठी सहकार्य केले. अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शनास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली.
शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे (तात्या), सचिव सुदर्शन शिंदे, प्राचार्य डॉ. जी.डी. कोरे यांनी सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.











