‘आई सप्तशृंगी मातेचा जयघोष’ करत ग्रामस्थांची पायी वाटचाल; भक्तिमय वातावरणात ज्योतीचे गावात आगमन
कळवण : श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आणि देवीची पवित्र ज्योत घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ‘सर्वमंगल मांगल्ये… बोल अंबे की जय!’ अशा जयघोषात भाविक गडावरून कळवण मार्गे पायी प्रवास करत आहेत.
याच भक्तिमय वातावरणात कळवण तालुक्यातील निवाणे गावातील ग्रामस्थ आणि तरुणांनी उत्साहाने सहभाग घेत सप्तशृंगी गडावरून देवीची पवित्र ज्योत पायी निवाणे गावापर्यंत आणली. श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक एकतेचे दर्शन घडविणाऱ्या या पायी दिंडीमुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
या पायी दिंडी व ज्योत आणण्याच्या सोहळ्यात गौरव हिरे, निखिल आहेर, बबन सूर्यवंशी, रोशन आहेर, गुलाब सोनवणे, बिट्टू सोनवणे आणि लखन सोनवणे यांच्यासह निवाणे गावातील बहुसंख्य ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
देवीच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमातून ग्रामस्थांची आई सप्तशृंगी मातेप्रती असलेली श्रद्धा आणि गावातील एकजूट दिसून आली. या पायी दिंडीमुळे निवाणे गावासह परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.










