सारथी महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
नवी मुंबई प्रतिनिधी :-अमोल अभंग
नवी मुंबई:
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळांमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालवाड्यांमधील शिक्षिका आणि मदतनिसांच्या मानधनात तातडीने वाढ करण्यात यावी, अशी जोरदार मागणी श्रमिक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात श्रमिक सेनेच्या शिष्टमंडळाने महापौर सुजाता पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
मानधन वाढीची प्रमुख कारणे व मागण्या:
- ७ वर्षांपासून मानधन वाढ नाही: महापालिकेच्या सेवेत २० ते २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात गेल्या सात वर्षांत कोणतीही वाढ झालेली नाही.
- सध्याचे मानधन: सध्या बालवाडी शिक्षिकांना दरमहा १६,५०० रुपये आणि मदतनिसांना १३,५०० रुपये मानधन दिले जाते.
- कामाचा व्याप वाढला: गेल्या काही वर्षांत बालवाड्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळे शिक्षिका आणि मदतनिसांच्या कामाचा व्यापही वाढला आहे.
- महगाईचा फटका: वाढती महागाई आणि दैनंदिन खर्चाचा भार पेलणे या तुटपुंज्या मानधनामुळे कर्मचाऱ्यांना अत्यंत कठीण जात आहे.
या सर्व बाबींचा विचार करून बालवाडी शिक्षिका व मदतनिसांच्या मानधनात तातडीने सन्मानजनक वाढ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या शिष्टमंडळात श्रमिक सेनेचे अध्यक्ष राजू सिंग, सचिव रुपाली कुमावत, चरण जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि बालवाडी शिक्षिका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.







