पाथर्डी तालुका प्रतिनिधी दि. १३ : पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे एकाच मंदिरात चार देवींचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. ११ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
निवडुंगे येथील या मंदिरात कालिकामाता, तुळजाभवानी माता, महालक्ष्मी माता आणि रेणुका माता या चार देवींच्या मूर्ती एकाच ठिकाणी विराजमान आहेत. या चारही देवींचे एकत्रित मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, त्याचा उल्लेख कानिफनाथ भक्ती अमृत या ग्रंथातही आढळतो.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत कापडी कमानी उभारून त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराचे रूप अधिकच खुलून दिसत असून, दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते.







