पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे मागणी करूनही रस्ता होईना
स्वतंत्रदिनी कऱ्हेवडगाव येथे युवक अर्ध नग्न आंदोलन करणार
आष्टी प्रतिनिधी – तालुक्यातील बीड -अहिल्यानगर महामार्गापासुन ५ कि.मी अतरांवरील कऱ्हेवडगाव या १८०० लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिकांना जाण्या – येण्यासाठी कच्चा अथवा पक्का रस्ता नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदरील ठिकाणी डांबरीकरण रस्ता करण्यात यावा यासाठी देशाच्या पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, सदरील विभागाचे मंत्री यांच्याकडे मागणी करूनही रस्ताचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी (१५ऑगस्ट) कऱ्हेवडगाव येथील युवक रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्ड्यात बसून अर्ध नग्न आंदोलन करणार आहेत.
याबाबत सदरील दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गांधणवाडी-आंधळेवाडी फाटा (NH ५६१ ) ते नागरगोजे वस्ती- सांडवावस्ती-आठेगावपुठा, या वस्त्या गाव अथवा इतर कोणत्याही मुख्य रस्त्याला अद्याप पर्यंत कच्च्या अथवा पक्क्या रस्त्याने जोडण्यात आलेल्या नाहीत येथील नागरिकांना गावाकडे अथवा इतरत्र जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कऱ्हेवडगाव – गांधणवाडी-आंधळेवाडी फाटा (NH ५६१) ते नागरगोजे वस्ती – सांडवावस्ती-आठेगावपुठठा- कऱ्हेवडगाव (अंदाजे ५कि.मी)
या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी कऱ्हेवडगावमधील ग्रामस्थ अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. काही दिवसांपूर्वीच सदरील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ग्रामस्थांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे. देश स्वतंत्र होऊन जवळपास 75 वर्षे झाली. अद्याप नागरिकांना रस्त्याची सोय झालेली नाही.याविषयीचे सविस्तर निवेदन पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करून देखील रस्ता होत नसल्यामुळे अखेर दि. १५रोजी सकाळी ११.००वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
70 वर्षात डांबर पाहायला मिळाले नाही
कऱ्हेवडगाव येथे 1972 साली साठवण तलावासाठी क्षेत्र अधिग्रहण झाल्याने वडिलोपार्जित घर सोडून स्थलांतरित झालोत. आमच्या बाप जाद्याने रस्त्याचे स्वप्न पाहिले होते.आमची पिडी गेली आता आमच्या नातवाची पिडी चालली आहे. मायबाप सरकारने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा ही ग्रामस्थांची मागणी आहे.
-विठ्ठल नागरगोजे,
(ग्रामस्थ, कऱ्हेवडगाव)
Discussion about this post