करील मनोरंजन जो मुलांचे !
जडेल नाते प्रभुशी तयाचे …….
खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
*- साने गुरुजी*
*👉या कवितेतच गुरुजींच्या जीवन विषयक संकल्पना सामावलेल्या आहेत !*
*👉दि.24 डिसेंबर 1899 रोजी दापोली जवळील पालगड गावी पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांचा जन्म झाला . सदाशिवराव आणि यशोदाबाई यांचे ते तिसरे अपत्य . खोतांचे काम त्यांच्याकडे वंशपरंपरेने आले होते . सर्वसाधारणपणे खोत वैभवसंपन्न असत . सरकारसाठी जमा केलेल्या महसूलातील 25 टक्क्यांवर त्यांचा हक्क असे . पण सदाशिवरावांच्या वेळेपासून त्यांची आर्थिक स्थिती घसरून डबघाईला आली होती . त्यांच्या घरादारावरही जप्ती आली होती . साने गुरुजींवर त्यांच्या आईच्या शिकवणूकीचा फार मोठा प्रभाव होता . इ.स.1917 साली गुरुजींच्या आईचा स्वर्गवास झाला . वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे यशोदाबाईंचा मृत्यू ओढवला . तसेच त्यांच्या मृत्यूसमयी गुरुजी आईजवळ हजर राहू शकले नाहीत . या गोष्टींची आयुष्यभरा साठीची रुखरुख त्यांना लागली .*
*👉गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगड येथेच झाले . पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्याला मामांकडे धाडण्यात आले . पुण्यातील वास्तव गुरुजींना आवडले नाही . दापोलीच्या मिशनरी स्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण सुरू झाले . दापोलीच्या शाळेत ते हुशार विद्यार्थी म्हणून चमकले . मराठी व संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते . येथेच त्यांना काव्याचे वेड लागले . आर्थिक अडचणींमुळे त्यांना दापोलीतील रेसिडंट मिशनरी स्कूलमधले शिक्षण परवडेनासे झाले , म्हणून त्यांनी औंधमधील गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत रहाण्या जेवण्याची सोय असलेल्या संस्थेत प्रवेश घेतला . पण प्लेगच्या महाभयंकर साथीमुळे सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या गावी परतावे लागले . गुरुजींनी पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात प्रवेश घेतला . त्यांचे पुण्यातील वास्तव्य अतिशय कष्टप्रद होते . दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असे . अशाही परिस्थितीत गुरुजींनी शिक्षणात आपले अव्वल स्थान टिकवले होते . इ.स.1918 साली ते चांगल्या मार्कांनी मॅट्रिकची परिक्षा पास झाले . पदवीच्या अभ्यासक्रमासाठी त्यांनी न्यू पूना कॉलेज म्हणजेच आजच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला . येथून ते मराठी आणि संस्कृत साहित्यामध्ये बीए आणि एमए च्या परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले .*
*👉साने गुरुजींचे वडील सदाशिवराव , लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते . पण काही काळ तुरुंगवास भोगावा लागल्यामुळे त्यांनी राजकारणा पासून दूर राहणेच पसंत केले .साने गुरुजींच्या जडणघडणीवर त्यांच्या आईचा मोठा प्रभाव होता . इ.स.1924 ते इ.स.1930 या काळात त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षकाची नोकरी केली . प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाचीही जबाबदारी त्यांच्यावर होती . इ.स.1928 साली त्यांनी ‘ विद्यार्थी ‘ हे मासिक सुरू केले . गुरुजींवर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा पगडा होता . साने गुरुजींना उत्तम वक्तृत्त्वाची देणगी उपजतच लाभली होती . नागरी हक्क व न्याय या विषयांवरील आपल्या भाषणांनी ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत . आपल्या विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला . त्यांचे ‘ विद्यार्थी ‘ हे मासिक विद्यार्थ्यांचे अतिशय आवडते होते . गुरुजी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते .*
*👉इ.स.1930 साली सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली . पुढील आयुष्य त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी वेचले .*
*👉त्यांनी ‘ काँग्रेस ‘ नावाचे साप्ताहिक काढले ,दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले .इ.स.1936 सालचे फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी झटले . फैजपूर अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ग्राम स्वच्छतेचे , मैला वाहण्याचेही काम केले .इ.स.1942 साली भूमीगत राहून त्यांनी स्वातंत्र्याचा प्रचार केला . साने गुरुजींनी ‘ राष्ट्र सेवा दला ‘ ची स्थापना केली . एस. एम. जोशी , ना.ग.गोरे , मधू दंडवते , श्रीराम लागू , निळू फुले , स्मिता पाटील आदिंनी राष्ट्र सेवा दलाला योगदान दिले.*
*👉’ बलसागर भारत होवो ‘ अशा देशभक्तीपर कविता लिहून त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्य लढ्याचे स्फुल्लिंग तेवत ठेवले . नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या .*
*👉अस्पृश्यता , जातीभेद अशा अनिष्ट रुढी व परंपरांचा गुरुजींनी विरोध केला .इ.स.1946 साली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला . उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले . ” एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले ” असे त्यावेळी म्हटले गेले .*
*👉स्वातंत्र्योत्तर काळात ते समाजवादी पक्षात सामील झाले . आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला . ते स्वतः तमिळ , बंगाली आदि भाषा शिकले .*
*👉इ.स.1948 साली त्यांनी ‘ साधना ‘ साप्ताहिक सुरू केले . एक साहित्यिक म्हणूनही त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे . त्यांच्या कथा , कादंबऱ्या , लेख , कविता यामधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिक दिसतो . देशभक्ती , सामाजिक सुधारणा , मानवतावाद त्यांच्या साहित्यातून व्यक्त होतो . त्यांचे बहुतांश लेखन तुरुंगात झाले .*
*👉’ श्यामची आई ‘ ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात लिहिली . या पुस्तकाच्या तीन लाखाहून अधिक प्रती खपल्या आहेत .इ.स.1953 साली या पुस्तकावर आधारित आचार्य अत्रे दिग्दर्शित ‘ श्यामची आई ‘ याच नावाचा चित्रपट पडद्यावर झळकला . हा चित्रपट खूप गाजला . त्याला राष्ट्रपती पदकही मिळाले . आचार्य विनोबा भावे रचित ‘ गीता प्रवचने ‘ साने गुरुजींनी इ.स.1932 साली धुळे येथील तुरुंगात लिहिली . बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लीवर यांच्या ‘ कुरल ‘ नावाच्या महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले . तसेच फ्रेंच भाषेतील ‘ ला मिझरेबल्स ‘ या कादंबरीचा अनुवाद केला . डॉ. हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञाच्या ‘ The story of human race ‘ या पुस्तकाचे ‘ मानवजातीचा इतिहास ‘ असे मराठीत भाषांतर केले .*
*👉एस.एम.जोशी , ना.ग.गोरे , मधू दंडवते , ग.प्र.प्रधान , यदुनाथ थत्ते , राजा मंगळवेढेकर , दादा गुजर अशी अनेक थोर व्यक्तीमत्व त्यांच्या मुशीतून घडत गेली .*
*😔स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गुरुजींचा अनेक बाबतीत भ्रमनिरास झाला . महात्मा गांधींच्या हत्येचा खोलवर आघात त्यांच्या कवीमनावर झाला . गांधीवधानंतर त्यांनी एकवीस दिवसांचे उपोषण केले होते . स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक कारणांनी ते अस्वस्थ होते . त्यांना नैराश्य आले होते . या नैराश्यातूनच दि.11 जून 1950 रोजी झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्या केली .*
*🙏स्वातंत्र्यसैनिक , गांधीवादी व समाजवादी विचारवंत , सामाजिक कार्यकर्ते मराठी साहित्यिक असे अष्टपैलू व्यक्तीमत्व असणाऱ्या या कोमल हृदयी कवीस आज जन्मदिनी विनम्र अभिवादन !
श्री विजय रायमलकर सर
Discussion about this post