सर्वसामान्य कुटूंबाना आजच्या जागतिक स्तरावरील प्रचलित उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या पद्मावती शांतीसेवा फौंडेशन ने ‘फर्स्ट स्टेप’ शाळेची सुरुवात दोन वर्षांपूर्वी केली. आज या शाळेमध्ये जागतिक मान्यतेचे शिक्षण चिमुकल्यांना शिकवले जाते. जागतिक स्पर्धेमध्ये हि पिढी चांगल्या संस्काराची घडावी आणि टिकावी या उद्देशाने आघाडीचे उद्योजक आणि संस्थेचे सर्वेसर्वा विवेक उर्फ बंडू शेटे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अपर्णा शेटे यांनी अथक प्रयत्नातून प्राचार्या कविता मेहरा यांच्या सहयोगातून ‘फर्स्ट स्टेप’ची उभारणी केली. नुकतेच शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बांधकाम विकसक आणि यु आर सिटी सर्वेसर्वा चे श्री व सौ किशोर पटवर्धन उपस्थितीत होते, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री विवेक उर्फ बंडू शेटे, सौ अपर्णा शेटे यांनी त्यांचे स्वागत केले. ‘रेट्रो तो मेट्रो’ संकल्पनेवर आधारित या स्नेहसंमेलनामध्ये लहान गटापासून मोठ्या गटातील मुला मुलींनी जेष्ठ अभिनेते कै राजकपूर, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती ते आतापर्यंत अभिनेत्यांच्या हिंदी चित्रपटातील गीतांवर सुंदर शी नृत्ये सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये उद्योजक किशोर पटवर्धन यांनी मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांना शोधून त्यात मुलांचे भविष्य उज्ज्वल करावे व शिक्षणातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोनावर भाष्य करून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास व जिज्ञासा वाढविण्यासाठीचे महत्त्व सांगितले. तर सौ पटवर्धन यांनी मुलांचे नृत्य पाहून आपले बालपण आठवल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली शाळेच्या मुख्याध्यापिका कविता मेहरा यांनी पाहुण्यांचे स्वागत करून शाळेच्या यशाचा आढावा घेतला तसेच मुलांनी शालेय सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलांना पाहूण्यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला, आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री विवेक उर्फ बंडू शेटे यांनी पालकांच्या सहकार्याबद्दल आभार मानून येणाऱ्या काळात ही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली, पाहूण्यांची ओळख प्रा विजय धुमाळ यांनी करून दिली, यावेळी सराफ असोसिएशन चे मिरज शहर अध्यक्ष सुनिल चिपलकट्टी, उद्योजक विलास देसाई, किरण भुजूगडे, शिक्षकवर्ग व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.
Discussion about this post