जिल्ह्यातील युवांनी केलेल्या सामाजिक हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवक विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने देण्यात येणाऱ्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवती आणि युवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, जिल्हा युवा पुरस्कारांमध्ये 13 ते 35 वर्षांच्या आतील एक युवक, एक युवती करिता रोख रक्कम रू. 10000/- गौरवपत्र, सन्मानचिन्ह तसेच एका नोंदणीकृत संस्थेसाठी रोख रक्कम रू. 50000/- गौरवपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. प्राप्त प्रस्तावामधून जिल्हास्तर युवा पुरस्कार निवडीसाठी जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत सन 2022-23 व सन 2023-24 या दोन वर्षांच्या पुरस्कारांसाठी स्वतंत्रपणे दोन लिफाफ्यांमध्ये अर्ज 15 जानेवारीपर्यंत मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव सादर करताना लिफाप्यावर अर्जाचे वर्ष नमूद करणे आवश्यक राहील. स्वयंस्फूर्तीने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्र, चित्रफिती, फोटो इत्यादी सबळ पुरावे अर्जदारांना प्रस्तावसह जोडावी लागणार आहेत. युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी दि. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षांची कामगिरी विचारात घेण्यात येईल.
ग्रामीण, नागरी भागात केलेले सामाजिक काम, राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती व जनजाती आदिवासी भाग आदिंबाबतचे कार्य तसेच शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रृणहत्या, व्यसनमुक्ती, तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या महिला सक्षमीकरण, साहस इत्यादिंबाबतच्या कामांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
Discussion about this post