जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी
रेशीम रथाला दाखविली हिरवी झेंडी
लातूर…….
- शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचे आवाहन
- रेशीम अभियान विषयक घडीपुस्तिकेचे प्रकाशन
लातूर जिल्ह्यात ९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महारेशीम अभियान २०२५ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रेशीम शेतीविषयी जनजागृतीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने रेशीम रथ तयार केला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज रेशीम रथाला हिरवी झेंडी दाखवून जनजागृती व नाव नोंदणी मोहिमेचा शुभारंभ केला. रेशीम शेतीविषयी तयार करण्यात आलेल्या घडीपुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी त्यांच्या हस्ते झाले.
रेशीम ही कमी पाण्यात आणि कमी काळात उत्पन्न देणारे पीक आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचून रेशीम शेतीची माहिती द्यावी. यामध्ये ज्या गावामध्ये रेशीम शेतीला सुरुवात झाली आहे, अशा गावांच्या आजूबाजूंच्या गावावर लक्ष केंद्रित करून क्लस्टर स्वरुपात रेशीम शेतीचा प्रसार करण्यावर भर द्यावा. सध्या रेशीम शेती करीत असलेल्या शेतकऱ्यांनीही आपल्या गावातील इतरही शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
जिल्ह्यात ९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महारेशीम अभियान राबविले जात आहे. या काळात शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्व समजावून सांगण्यासोबतच इच्छुक शेतकऱ्यांची नाव नोंदणी करून घेण्यात येणार आहे. रेशीम शेतीसाठी अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून एका एकरासाठी सुमारे ४ लाख १८ हजार रुपये अनुदान देय आहे. तसेच इतर शेतकऱ्यांना सिल्क समग्र-२ योजनेतून एका एकरासाठी सुमारे ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान देय असल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट यांनी दिली.
रेशीम शेतीसाठी नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयातील वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व्ही. पेठकर (भ्रमणध्वनी क्र. ९३७०९३७५९२), क्षेत्र सहायक एस. आर. सुरनर (भ्रमणध्वनी क्र. ७५०७६५७४२०), लातूर, अहमदपूर व देवणी तालुक्यासाठी मनरेगा तांत्रिक सहायक एस.व्ही. पवार (भ्रमणध्वनी क्र. ८६२३००२२४०), रेणापूर, शिरूर अनंतपाळ व उदगीर तालुक्यासाठी मनरेगा तांत्रिक सहायक आर. ए. कदम (भ्रमणध्वनी क्र. ८७९३८१३२२६), औसा व निलंगा तालुक्यासाठी मनरेगा तांत्रिक सहायक आर. एन. देशमुख (भ्रमणध्वनी क्र. ७३५०५०५८७३) आणि चाकूर व जळकोट तालुक्यासाठी मनरेगा तांत्रिक सहायक आर. बी. वाघमारे (भ्रमणध्वनी क्र. ८८८८२८२५३०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रेशीम विकास अधिकारी श्री. वराट यांनी केले आहे.
Discussion about this post