
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मुलांच्या बौध्दिक क्षमता विकसित करण्याचे काम करणारे एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांना अखिल विश्वकर्मीय समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘गौरव महाराष्ट्राचा, सोहळा आनंदाचा’ अंतर्गत शिक्षण क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.**हा पुरस्कार सोहळा रविवार दि. १९ जानेवारी २०२५ रोजी इंद्रकुंड, पलुस्कर हॉल, पंचवटी, कारंजा, नाशिक येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पडणार आहे. या पुरस्काराबद्दल पांचाळ यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे.**सदाशिव पांचाळ यांनी सुमारे एक लाखाहून अधिक मुलांना ‘पाढ्यांची कार्यशाळा’ या उपक्रमांतर्गत दोन, तीन आणि चार अंकी पाढे कॅल्क्युलेटरपेक्षा वेगाने तयार करण्याचे प्रशिक्षण विनामूल्य दिले आहे. या व्यतिरिक्त त्यांची ‘बूध्दि’बळ ही ‘मुलांच्या बुध्दीचे बळ वाढवणारी कार्यशाळा’ देश-विदेशात गाजत आहे. या त्यांच्या कार्यशाळेला देशभरातून विद्यार्थी आणि पालक उपस्थित असतातच, पण दुबई, आबुधाबी, कतार, दोहा, सौदी अरेबिया, नेदरलँड, मलेशिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांतून लोक उपस्थित असतात.**मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील पियाळी गावचे आणि आता तळेरे येथे वास्तव्यास असलेले पांचाळ यांनी आतापर्यंत देशभरात सूमारे १७०० लाईव्ह कार्यशाळा यशस्वीरित्या हाताळल्या आहेत.* *लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातूनसुध्दा ७०० च्या आसपास कार्यशाळा घेतल्या आहेत. ‘चला, हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमाच्या सेटवर सदाशिव पांचाळ यांनी स्मरणशक्ती प्रात्यक्षिके सादर केली आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एक हजार मुलांना एकत्र मार्गदर्शन केले आहे.**यापूर्वी त्यांच्या कार्याची दखल घेऊन १५० पेक्षा अधिक संस्थांनी सदाशिव पांचाळ यांचा गौरव केला आहे. यामध्ये अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांना लाभले आहेत. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही अनेक मुलाखती झालेल्या आहेत.**विशेष म्हणजे केवळ विद्यार्थी आणि पालक एवढ्यापुरते त्यांचे कार्यक्रम मर्यादित नसून त्यांच्या कार्यशाळेला डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षणाधिकारी, सर्व शिक्षा अभियानचे अधिकारी अशी अनेक मंडळी आवर्जून उपस्थिती लावतात.
Discussion about this post