500 ब्रास रॉयल्टी अन् 15 दिवस वाहतूक ?
तलाठी, मंडळ अधिकारी यांचे दुर्लक्ष का ?
तहसिलदार, प्रातांधिकारी लक्ष देणार का?
आप नेते ग्यासुद्दीन खान यांची तक्रार

खालापूर/प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यातील माणकिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत डोलवली येथे गेल्या काही दिवसांपासून गौण खनिज माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र, महसूल विभाग या प्रकाराबाबत गंभीर नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अवैध गौण खनिजावर नियंत्रण ठेवण्यासाठी गाव पातळीवर तलाठी तसेच मंडळ अधिकारी महसूल विभागाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतात. गौण खनिजावर लक्ष ठेवणे हे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे आद्य कर्तव्य आहे. गौण खनिजाबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात दाखल करणे हे कार्य तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केले पाहिजे. तसेच रॉयल्टी भरून परवानगी घेतलेल्या गौण खनिजाची परवान्यानुसार व नमूद केलेल्या मुदतीत तसेच भरलेल्या रॉयल्टीत उत्खनन होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम देखील मंडळ अधिकारी व तलाठी यांचेच असते. परंतु, प्रत्यक्षात महसूल अधिकारी, कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. माणकिवली, केळवली, डोलवलीतील काही ठिकाणी नावाला रॉयल्टी भरली जाते आणि हजारो ब्रास उत्खनन केले जात असल्याचे दिसून येत आहे.
रॉयल्टी भरलेल्या गौण खनिजाच्या कित्येक जादा पटीने उत्खनन होत असताना कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. रॉयल्टी भरलेल्या जागेवर साधी पाहणी केली जात नाही. यामागे महसूल विभाग कोणते हितसंबंध जोपासत आहे, हे अनाकलनीय असल्याचे आम आदमी पार्टीचे खोपोली शहर अध्यक्ष ग्यासूद्दीन खान यांच्याकडून बोलले जात आहे.डोलवली येथे डोंगराला अनेक ठिकाणी पोकलन मशीन व हायवा डंपरद्वारे मुरूम खोदून मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात आहे. सुट्टीच्या दिवशी तर अक्षरशः धुमाकूळ घालत आठ – दहा हायवा डंपर लावून रात्री उशीरापर्यंत मुरूम वाहतूक केली जात आहे. वाहतूक करताना डोलवली स्टेशन परिसरात रस्त्यावर धूळ माती उडू नये यासाठी पाण्याचे टँकर रिते केले जात आहेत. अवैध गौण खनिज वाहतूक करणार्या वाहनांमुळे परिसरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ओव्हरलोड आणि सुसाट चालणारी वाहने नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खननाला अधिकार्यांचा आशिर्वाद असल्याची चर्चा सुरू आहे, त्याला आर्थिक लागेबांध्याची किनार असल्याचे देखील बोलले जात आहे. विकासाच्या (डेव्हलपमेंट) नावाखाली डोंगरचे – डोंगर भुईसपाट होताना दिसून येत आहेत. पंधरा दिवसापासून मुरूमची मोठ्या प्रमाणत वाहतूक व उत्खनन सुरू असताना 500 ब्रास रॉयल्टी भरली असल्याची माहिती मंडळ अधिकारी पानसरे देत, जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती आम आदमी पार्टी (आप) चे खोपोली शहर अध्यक्ष ग्यासूद्दीन खान यांनी पत्रकारांना दिली. तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी देखील खान यांनी केली आहे.ते पुढे म्हणाले की, एका हायवा डंपरमध्ये 6 ब्रास मुरूम बसतो आणि तो दिवसभरात 10 फेऱ्या मारतो म्हणजे त्या डंपरमध्ये दिवस भरात 60 ब्रास मुरूम वाहतूक होते. तसेच पोकलन मशीनखाली दहा डंपर असतात म्हणजे अंदाजे एका दिवसाला 600 ब्रास मुरूम वाहतूक होते. म्हणजे दहा दिवसाला 6 हजार ब्रास मुरूम वाहतूक केली जातो. अंदाजे एका ब्रास मुरूमसाठी 600 रुपये रॉयल्टी आहे. म्हणजे 600 ब्रासला 60 हजार आणि 6 हजार ब्रासला 3,600,000 लाख रुपये रॉयल्टी होते. तर 500 ब्रास रॉयल्टी भरून सरार्सपणे हजारो ब्रास उत्खनन केले जाते आणि शासनाचा लाखो, करोडो रुपयांचा महसूल माफियाकडून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने बुडविला जात आहे.
तलाठी व मंडळ अधिकारी माफियांवर मेहरबान होता, याचीच चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. तर महसूलमधल्या अधिकाऱ्यांच्या मेहरबानीनेच रॉयल्टीपेक्षा दहा, वीस तर काही महाबहाद्दरांनी जवळपास तीस पट जादा उत्खनन व भराव केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तहसीलदार व प्रातांधिकारी यांनी स्वत: लक्ष घालून ‘इन कॅमेरा’ पंचनामे केले तर सर्व उघड होईल. मात्र, खालापूर तालुक्याचे मंडळ अधिकारी पानसरे पाहणी करण्यापेक्षा मुरूम माफियांनी 500 ब्रासची रॉयल्टी भरली आहे आणि सात-आठ दिवसांपासून गाड्या सुरु असल्याची माहिती देतात. मात्र, समक्ष जावून किती ब्रास उत्खनन करण्यात आले आहे, याची माहिती घेण्याचे कष्ट सुद्धा ते घेत नसल्याचे समोर आले आहे. उलट मुरूम माफियांना माझी तक्रार आल्याचे सांगत काम बंद ठेवा किंवा त्यांना फोन करा, असे सांगत आहेत. कोट्यावधी रुपयांचे महसूल बुडविणाऱ्या माफियांवर मंडळ अधिकारी पानसरे इतके महेरबान का ? अशा बेजबाबदार मंडल अधिकारी यांची सखोल चौकशी कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, कर्जत प्रांताधिकारी, खालापूर तहसिलदार यांनी साईटवर जावून मीडियासह सर्व नागरिकांसमोर ‘ऑन द स्पॉट’ इन कॅमेरा पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे ? मुरूम माफिया व कामात कसूर करणाऱ्या मंडळ अधिकारी यांना निलंबित करावे? तालुक्याच्या एक ठिकाणी इतके मोठे उत्खनन होत आहे तर संपूर्ण खालापूर तालुक्यात किती उत्खनन होत असावे ? असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला आहे.खालापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून डेव्हलपमेंटमध्ये कमालीची वाढ होतांना दिसत आहे. मात्र, डेव्हलपर्स आणि ठेकेदाराने डेव्हलपमेंट करताना सर्वसामान्य जनता जनार्दनांचा, गावकऱ्यांचा कोणताच विचार न करता पातळगंगा नदीत खालापूर येथे संरक्षण भिंत बांधण्यात सुरुवात केली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गालगत एका डेव्हलपर्सने भला मोठा डोंगर खोदून डोंगर कड्यातून येणारे नैसर्गिक नालेच मुरूम मातीने बुजविले आहेत. उत्खननासाठी परवानगी देताना तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार (महसूल), तलाठी, मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून भराव करण्याची परवानगी दिली व 500 ब्रास रॉयल्टी भरली, पण यांनी देखील किती ब्रासचे उत्खनन केले आहे याची पाहणी मंडल अधिकारी पानसरे यांनी का केली नाही ? भराव करून नदीचा प्रवाह कमी करीत नैसर्गिक नाले देखील बुजविले जात आहेत तरी या श्रीमंत डेव्हलपर्सवर कोणतीच कारवाई होताना का दिसून येत नाही ? त्यांच्यावर तलाठी, मंडळ अधिकारी इतकी मेहरबानी का दाखवतात? येणाऱ्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले व त्यांचे जीव गेले की या अधिकाऱ्यांवर कार्रवाई होणार का ? भाईजान उत्खनन व भराव करणारा ठेकेदार असल्यामुळे महसूल अधिकारी याच्या दहशतीला बळी पडत आहेत का ? हे मंडल अधिकारी व तलाठी पत्रकार, तक्रारदार यांची नावासकट माहिती देत असल्याचे अनेक वृत्तपत्रात वाचले आहे. त्याचा आज अनुभव आला, माझी माहिती मंडळ अधिकारी यांनी भाईजानला दिली असल्याचे माझ्यासमोर आले आहे. उत्खनन व भरावाचे कोटी रुपयाचे महसूल बुडवले जात असताना कर्जत प्रांताधिकारी, खालापूर तहसीलदार, दुर्लक्षपणा का करत आहेत ? ज्या ठिकाणी उत्खनन व भराव करण्यात आले आहे, त्या-त्या ठिकाणाचे ‘इन कॅमेरा’ मीडियासमोर पंचनामे करून दंड ठोठावे व दोषींवर कार्रवाई करण्यात यावी, अन्यथा आम आदमी पार्टीकडून संपूर्ण तालुक्यात तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे खोपोली शहर अध्यक्ष ग्यासूद्दीन खान यांनी दिला आहे.
Discussion about this post