खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद संचलित कै. र. वा. दिघे वाचनालयात गरुडझेप स्पर्धा परिक्षा केंद्र (अभ्यासिका वर्ग) तयार करण्यात आलेला असून या अभ्यासिकेचा सन 2022 पासून आजगायत 287 अभ्यासकांनी लाभ घेतला आहे.या वाचनालयात अभ्यासिका ही मोफत असून दैनंदिन 50 ते 60 अभ्यासक अभ्यासाकरीता येत असतात. तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून गरुडझेप स्पर्धा परिक्षा केंद्र खोपोली नगर परिषदेच्या कै. र. वा. दिघे वाचनालयात स्थापन करण्यात आले होते. या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परिक्षेकरीता येणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, या उद्देशाने पुस्कांचा साठा उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सदर पुस्तके ही या ठिकाणी अभ्यासाकरीता मोफत उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होवू नये, याकरीता शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय वाचनालयात करण्यात आली आहे.
सदरची अभ्यासिका वर्ग 24 तास अभ्यासाकरीता खुली ठेवण्यात आली आहे. या अभ्यासिकेत खोपोली शहरासह खालापूर, कर्जत, नेरळ, बदलापूर या ठिकाणांहून विद्यार्थी येत आहेत.या गरुडझेप स्पर्धा परिक्षा केंद्राचा लाभ घेऊन स्पर्धा परिक्षेत अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यात सुजित पवार, मयुर शेगट, विकी मोरे, अक्षय जाधव, चेतन हिरवा, दिनेश शेडगे, किरण गोरे, गणेश श्रीखंडे, ओंकार निंबाळे, गौरव जाधव, जयश्री मालुसरे, प्रथमेश येवले यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले असून त्यांना वाचनालयाचे व खोपोली नगर परिषदेचे आभार मानले. तसेच 10 वी, 12 वी, व महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा या अभ्यासिकेचा वापर करुन यश प्राप्त करीत आहेत. खोपोली नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांचे प्रोत्साहन नेहमी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना मिळत असते. या अभ्यासिकेचा लाभ शहरातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांनी केले आहे.
Discussion about this post