जिल्हा मध्यवर्ती बँकेत एटीएम कार्डचा तुटवडा
गत नोव्हेंबर महिन्यापासून कार्ड उपलब्ध नाही,वैधता संपलेल्या ग्राहकांना माराव्या लागत आहे बँकेच्या चकरा
गोंडपिपरी:शहरात बँक ऑफ इंडिया,जिल्हा मध्यवर्ती बँक, एचडीएफसी बँक,कन्यका नागरी इत्यादी मोठे आर्थिक व्यवहार करणारे बँका कार्यरत असून राजुरा नागरी सहकारी पतसंस्था,भाग्यश्री पतसंस्था,नागरी सहकारी पतसंस्था देखील आहेत.या अंतर्गत बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी,जिल्हा मध्यवर्ती बँक आणि १ इंडिया चे एटीएम मशिन उपलब्ध आहेत.यामुळे सुलभ रीतीने पैशाची उचल करण्यास मदत होत आहे.
कधी कधी यातील चलन तुटवड्यामुळे शहरातील निम्म्यापेक्षा अधिक एटीएममध्ये खडखडाट होत असते. पैसे नसल्याने अनेक एटीएम केंद्र रुबाबात उभी असतात. एटीएम सुरू असते मात्र त्यामध्ये अनेक ठिकाणी कार्ड स्वाइप केल्यानंतर नो कॅशचा संदेश ग्राहकांना मिळत असतो.एरव्ही हा विषय नाहीच्या घरात आहे.परंतु नागरिकांच्या एटीएम कार्डचा कालावधी पूर्ण झाला असेल तर अशात त्यांना कार्ड बदलवून मिळायला पाहिजे.आणि यासाठी एटीएम कार्ड बँकेत नित्याने उपलब्ध ठेवणे अनिवार्य आहे.मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेत कित्येक दिवसांपासून एटीएम कार्डच नाहीत.त्यामुळे कालावधी संपलेल्या ग्राहकांना बँकेत चकरा माराव्या लागत असून त्यांना आर्थिक व्यवहार करण्यास अडचणीचे जात आहे. अचानक एटीएम कार्डचे प्रमाण का आटले याविषयी बँक अधिकारीही बोलण्यास तयार नाहीत.
एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा जसे चलनातून बाद झाले तसेच या बँकेतून एटीएम कार्ड नाहीसे झालेत.अशी स्थिती झाल्यानंतर बँकेनी लगेच कार्डाची व्यवस्था करायला पाहिजे होती.आत्ताही तीच परिस्थिती कायम आहे.ग्राहकांना जो पर्यंत एटीएम कार्डचा पुरवठा होत नाही तोपर्यंत ग्राहकासमोर आर्थिक पेच निर्माण होत राहील.बँकेत एटीएम कार्ड उपलब्ध नाही त्यामुळे ग्राहकांना ते देऊ शकत नाहीत.त्याचप्रमाणे या बँकेतील एटीएममध्ये पुरेसे पैसे देखील राहत नसल्याने एटीएम सेवा विस्कळीत होत असते.यामुळे ग्राहकांचा हिरमोड होऊन दुसऱ्या एटीएम केंद्राचा शोध घेतात. शहरात राष्ट्रीयकृ़त आणि खासगी बँकांचे तीन एटीएम आहेत. बँकेत जाऊन रांगेत उभे राहण्यापेक्षा एटीएमद्वारे पैसे काढण्याकडे नागरिकांचा कल आहे.
मात्र जेव्हा ही सेवा विस्कळीत होते तेव्हा नागरिकांना पैसे काढण्यासाठी बॅंकांचा आधार घ्यावा लागते.हा त्रास टाळण्यासाठी ग्राहक एटीएम कार्डचा वापर करतात.कारण यामुळे सुलभ रीतीने पैशाची उचल करता येते.परंतु या जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोव्हेंबर महिन्यापासून एटीएम कार्ड उपलब्ध नाही.अशात ज्यांच्या एटीएम कार्डची वैधता संपली अशांनी काय करावे ?.तीन महिने लोटून देखील बँकेत एटीएम नाही ही खेदाची बाब म्हणावी लागेल.आणि या बाबत कर्मचारी देखील उदासीन धोरण अवलंबिले असल्याचे दिसते.याचमुळे एका ग्राहकाला चक्क तीन महिन्यापासून एटीएम कार्डसाठी बँकेच्या चकरा माराव्या लागत आहे.तो जेव्हा जातो तेव्हा एटीएम कार्ड उपलब्ध नसल्याचे सांगितल्या जाते.यागोष्टिने तो पुरता वैतागून गेला असल्याने एके दिवशी त्याने कर्मचाऱ्यांची चांगलेच खरडपट्टी काढल्याचे समजते.
Discussion about this post