
उदगीर /कमलाकर मुळे :
2025 मध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरूपात राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत बसस्थानकांच्या स्वच्छतेसह सौंदर्यीकरण, सुविधा उन्नती आणि प्रवाशांच्या सोयींमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मराठवाड्यातील लातूर विभागीय स्तरावर एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.
विभागीय स्तरावरील समिती गठीत
राज्य परिवहन महामंडळाच्या (रा.प.) आदेशानुसार विभागीय स्तरावर विभाग नियंत्रक यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सामाजिक प्रतिनिधींना समाविष्ट करून प्रभावी निर्णयक्षम यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक, राज्य प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शासन नियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तसेच दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांची प्रशासकीय पदाच्या समितीमध्ये अशासकीय नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव यांच्या हस्ते दि.१८ रोजी मंगळवारी विभागीय कार्यालयात प्रशासकीय पातळीवर असदस्यशीय सदस्यपदी बालासाहेब गोविंदराव शिंदे यांना देण्यात आले.
समितीतील सदस्यांची नावे आणि जबाबदाऱ्या, समितीमध्ये खालील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष श्री. अश्वजीत जानराव विभाग नियंत्रक रा.प.लातूर, सदस्य श्री.,विभागीय अभियंता, रा.प.लातूर, अशासकीय सदस्य श्री.बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सदस्य श्री.आनंद माने लातूर असून वरील नवनियुक्त अध्यक्ष अशासकीय सदस्य पदाधिकारी हे समितीच्या खालील प्रमाणे जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धती पार पाडतील. समितीची मुख्य जबाबदारी विभागातील ‘ब’ व ‘क’ वर्ग बसस्थानकांचे मूल्यांकन करणे आणि गुणवत्तेनुसार त्यांना पारितोषिकांसाठी शिफारस करणे आहे. मूल्यांकन करताना स्वच्छता, सुविधा, व्यवस्थापन, प्रवाशांसाठीच्या सोयी, देखभाल-दुरुस्ती यासारख्या महत्त्वाच्या निकषांचा विचार केला जाणार आहे. समितीने प्रत्येक तीन महिन्यांनी एकदा बसस्थानकांची तपासणी करून त्याचा अहवाल मध्यवर्ती समितीकडे पाठवायचा आहे. त्यासाठी नियोजित वेळापत्रकानुसार मूल्यांकन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समितीच्या सदस्यांनी बसस्थानकांमध्ये थेट भेट देऊन स्थितीची पाहणी करणे आणि आवश्यक उपाययोजना सुचवणे अनिवार्य आहे. अभियानाची उद्दिष्टे आणि अपेक्षित परिणाम या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील बसस्थानकांच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार असून प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धात्मक दृष्टिकोन ठेवून कार्यरत बसस्थानकांना प्रेरित करणे, उत्कृष्ट सेवा देणाऱ्या बसस्थानकांना गौरविणे आणि त्यामुळे एकूणच परिवहन व्यवस्थेचा स्तर उंचावणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.
या मोहिमेमुळे राज्यातील बसस्थानके स्वच्छ आणि आकर्षक होण्यास मदत होईल. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांसह सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव तसेच शासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर व परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. राप महामंडळाच्या अशासकीय सदस्यपदी निवडीचे बालासाहेब गोविंदराव शिंदे यांना नियुक्तीचे पत्र देताना विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव, विभागीय लेखा अधिकारी गंडाळे अमित शाहूराज, विभागीय सांख्यिकी अधिकारी अतुल वळसंगकर, निरीक्षक अधिकारी व्यंकटराव बिरादार-पाटील नागलगावकर, अपघात विभागाचे अधिकारी शिवकुमार देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते..
Discussion about this post