महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सद्य स्थती मध्ये महापालिकेच्या भाड्याच्या जागेत आणि कार्यक्षेत्राच्या एका कोपऱ्याला आहे. त्यामुळे पीडितांची मोठी गैरसोय होत असल्याने पोलीस ठाणे पशु संवर्धन विभागाच्या शासकीय दूध डेअरी जागेत सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव द्यावा, अशी मागणी मिरज सुधार समितीने कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गुरुवारी सायंकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या परीक्षण दौऱ्यासाठी आले असता, मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, कार्यवाह असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, नरेश सातपुते, संतोष जेडगे, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, अभिजित दाणेकर आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली. मिरज रेल्वे जंक्शन, मुख्य बस स्थानक, कृष्णा घाटसह मिरज शहरातील मोठा विस्तारित भाग महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. सध्याचे पोलीस ठाणे कुपवाड रोड वरील महापालिकेच्या भाड्याच्या जागेत एका कोपऱ्याला असल्याने पीडितांना पोलीस ठाण्यात येण्यासाठी मोठी कसरत करावी. पोलीस यंत्रणेची सुध्दा मोठी दमछाक होते. म्हणून पोलीस ठाणे पशु संवर्धन विभागाच्या शासकीय दूध डेअरी जागेत सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव द्यावा, अशी मागणी मिरज सुधार समितीने कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे केली आहे.
Discussion about this post