

मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवरील बोगदा वगळता सर्व मार्गाच्या निविदा जाहिर..
अनेक टप्प्याचे काम झाले पूर्ण.. तर अनेक कामे प्रगती पथावर..
दै. सारथी महाराष्ट्राचा : जिल्हा प्रतिनिधी :- अनिल डाहेलकर..
ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी सन 2016 पासून अकोला हिवरखेड खंडवा हा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला होता. मागील नऊ वर्षांपासून रेल्वे प्रेमी नागरिक व प्रवासी हा मार्ग पूर्ण होण्याची चातकाप्रमाणे वाट बघत होते. आता रेल्वे प्रेमींची स्वप्न युद्ध स्तरावर पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे.
बहु प्रतीक्षेत असलेल्या अकोला हिवरखेड खंडवा इंदोर या रेल्वे मार्गासाठी हजारो लाखो नव्हे… करोडो नव्हे तर अरबो रुपयांच्या निविदा जाहीर झाल्याने रेल्वे प्रकल्प युद्ध स्तरावर पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या मार्गासाठी आवश्यक असणारे भूसंपादन आधीच पूर्ण झालेले आहे.
या मार्गावरिल अकोला अकोट गेज परिवर्तन पूर्ण होऊन डेमो रेल्वे धावत आहे. आमला खुर्द ते खंडवा हा मार्ग पूर्ण झाला असून त्यावर लवकरच रेल्वे धावणार आहे. खंडवा ते सनावद पर्यंत मार्ग पूर्ण झालेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर महू ते इंदोर मार्ग पूर्ण झालेला असून या मार्गावरून रेल्वे धावत आहेत.
आमला खुर्द ते तुकाईथड मार्गाचे कार्य प्रगतीपथावर आहे.
सनावद ते महू पर्यंत कोट्यावधीच्या निधीतून विविध टप्प्यात कार्य सुरु आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मोरटक्का येथे सुद्धा कार्य प्रगतीपथावर आहे.
आकोट पासून हिवरखेड स्टेशन सह वान नदीपर्यंत अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेपर्यंत 28 किमी मार्गासाठी तब्बल 553 कोटी रुपये निधीची निविदा निघाली आहे.
तसेच सर्वात मोठी 724 कोटींची निविदा खकनार ते उसरणी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेपर्यंत च्या 16.30 किमी मार्गासाठी निघाली आहे.
मध्यप्रदेशच्या सीमेपासून जामोद सोनाळा मार्गे हिवरखेड नजीकच्या वान नदीपर्यंत म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 22 किमी मार्गासाठी 424 कोटी रुपयांची निविदा निघाली आहे.
तुकईथड ते खकनार या 18.44 किमी मार्गासाठी 456 कोटीच्या निधीतून कार्य प्रगतीपथावर सुरू आहे.
अकोट ते अकोला आणि खंडवा ते आमला खुर्द या पूर्ण झालेल्या मार्गावर विद्युतीकरण मंजूर झाले असून त्यासाठी 145 कोटी रुपयांची निविदा निघालेली आहे.
फक्त मोठ्या बोगद्याची निविदा बाकी.
या मार्गावर महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर साडे सहा किमी पेक्षाही मोठा बोगदा होणार आहे. फक्त या बोगद्याची निविदा सोडता या मार्गावरील सर्व निविदा जाहीर झाल्या आहेत. अनेक टप्प्याची कामे पूर्ण झाली असून, अनेक टप्प्याची कामे प्रगतीपथावर आहेत. तर उर्वरित सर्व टप्प्यांसाठी सुद्धा अरबो रूपयांच्या निविदा जाहिर झाल्या आहेत.
प्रतिक्रिया :-
अकोला हिवरखेड खंडवा इंदौर या रेल्वे मार्गासाठी शेकडो रेल्वे संघर्ष कर्त्यांनी रक्ताचे पाणी करून संघर्ष केला आहे. आता जवळपास सर्व मार्गाच्या निविदा निघाल्याने युद्ध स्तरावर हा मार्ग पूर्ण होण्याचे स्पष्ट असल्याने सर्व संघर्षकर्त्यांना यश आल्याने आम्ही समाधानी आहोत. तसेच महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवरील बोगद्याची दुहेरी मार्गासह निविदा तात्काळ काढावी अशी आमची मागणी आहे.
सामूहिक संघर्षाचे फलित
या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव, खंडव्याचे खासदार ज्ञानेश्वर पाटील यांचे सह विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, विविध पत्रकार संघटना, हिवरखेड विकास मंच संयोजक धिरज बजाज, श्याम आकोटकर, स्वप्निल देशमुख, पूर्णेश उपाध्याय, शोएब वासेसा, सै. रियाज अली, राकेश भट्ट, मनोज सोनी, गणेश साहू, अमोल इंगळे, ऋषभ नग्रोटा, एड. मनीष जेस्वानी, राजकुमार भट्टड, विजय जितकर, प्रकाश शर्मा, गजानन राऊत यांच्यासह अनेक जागरूक नागरिक व शेकडो रेल्वे संघर्षकर्त्यांनी सातत्याने आवाज बुलंद केला आहे. त्याला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सर्वांच्या सामूहिक संघर्षाचे फलित दिसत आहे..
Discussion about this post