शाळा १ एप्रिल नव्हे; जूनमध्येच सुरू; शिक्षण राज्यमंत्र्यांच्या ‘माहिती’वर शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण!
शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण राज्यमंत्र्यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितलेले असताना, शिक्षण आयुक्तांनी मात्र येत्या शैक्षणिक वर्षात प्रचलित पद्धतीनुसार शाळा जूनमध्येच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.‘आगामी शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याचा प्रयत्न असून, याबाबत अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम सुरू केले आहे,’ असे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नुकतेच पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे राज्यभरातील शाळा, पालक, संस्थाचालक, शिक्षक अशा सर्वच घटकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली. अर्थात, त्याचे पुरेसे स्पष्टीकरण न मिळाल्याने या संदर्भात संभ्रमाचेच वातावरण होते. या पार्श्वभूमीवर, ‘येत्या शैक्षणिक वर्षात प्रचलित वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात येणार नाही. त्यामुळे शाळा जूनपासूनच सुरू होतील. शाळा सुरू करण्याच्या वेळापत्रकात बदल करायचा झाल्यास त्याबाबत सविस्तर चर्चा करणे, तसेच योग्य वेळ देणेही आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शाळा सुरू करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही,’ असे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी सांगितले.
Discussion about this post