प्रा.दिलीप नाईकवाड
सिंदखेडराजा/तालुका प्रतिनिधी
“गाव तेथे महसूल कार्यालय होत असल्याने आता शेतकऱ्यांसह तलाठ्यांना होणाऱ्या अडचणी दूर होणार असून शेतकऱ्यांची महसूल विभागाशी निगडित महत्वाची कामे जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.ग्रामीण भागात ठिकठिकाणी अशी ग्राम महसूल कार्यालय उभारण्यात येणार असल्याने खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना महसूल च्या कामासाठी खेटे मारावे लागणार नाही.गावातच महसूल कार्यालय उभारण्यात आल्याने गावातच कामे झाल्याने त्यांचा वेळ व पैसाही वाचेल ,”
असे प्रतिपादन सरपंच वासुदेव पांचाळ यांनी केले. ते येथून जवळच असलेल्या मौजे गोरेगाव येथील सुमारे १५ लाख रू किंमतीच्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाच्या पायाभरणी समारंभात उद्घाटनप्रसंगी बोलत होते. मौजे गोरेगाव येथील ग्राममहसूल अधिकारी कार्यालयाचे भूमीपूजन ता. २८ रोजी सरपंच वासुदेव पांचाळ यांच्या हस्ते विधिवत पूजा व कुदळ मारून पार पडले.याप्रसंगी उमणगाव चे सरपंच भिमराव खिल्लारे, पोलिस पाटील संजय खिल्लारे, उत्तम गवई,ग्राम महसूल अधिकारी आनंद राजपूत, माजी सरपंच सुभाष पांचाळ, विशाल अवचार, जयदीप पांचाळ , पठाण, कव्हळे, प्रकाश भगत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.गोरेगाव हलक्या अंतर्गत उमणगाव,पांगरी काटे,सावंगी ही गावे येतात.या गावातील लोकांना महसूल च्या कामासाठी साखरखेर्डा येथे यावे लागत होते.
माजी मंत्री तथा विभागाचे माजी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची महसूल ची कामे गावातच व्हावीत यासाठी सिंदखेडराजा मतदारसंघात एकूण ७४ ग्राममहसूल कार्यालयाची मंजूरी मिळविली होती.त्यामध्ये सिंदखेडराजा तालुक्यात ३६ तर देऊळगाव राजा तालुक्यात ३८ ग्राम महसूल कार्यालय उभारण्यासाठी नुकताच निधी मंजूर झाला असून ठिकठिकाणी सदर ग्राम महसूल कार्यालय उभारण्याची कामे सुरू झाली आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यातील प्रत्येक मंडळात होणार महसूल कार्यालय होणार
शासनाच्या गाव तेथे महसूल कार्यालय योजने अंतर्गत मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील जवळपास प्रत्येक मंडळात महसूल कार्यालय होणार असून त्यासाठी शासनाने सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
सद्या संपूर्ण तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालये बहुतांश ठिकाणी भाड्याच्या जागेत सुरु असून त्यामुळे शेतकऱ्यांसह मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु आता त्यांना त्यांच्या हक्काची कार्यालये मिळणार असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र.बीएलडी-२०२३/प्र.क्र.६६/ई-८ दि.१२ जुलै २०२४ नुसार सिंदखेडराजा तालुक्यात ७ मंडळ अधिकारी कार्यालये तसेच ४२ तलाठी कार्यालये असे एकूण ४९ महसूली कार्यालये होणार असून त्यासाठी सुमारे ५ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक मंडळ कार्यालयाचे क्षेत्रफळ ४३.०३ चौ. मी. व त्याची किंमत रु.२२.०२ लक्ष तसेच प्रत्येक तलाठी कार्यालयाचे क्षेत्रफळ २८.२६ चौ. मी. आणि त्याची किंमत रु.१४.८९ लक्ष इतकी ठरविण्यात येऊन त्यात मिटींग हॉलसह भागनिहाय कार्यालये तसेच शौचालय व कंपाउंडसह पार्किंगची ही व्यवस्था असणार आहे. या मंजूर झालेल्या इमारतींच्या अंदाजपत्रकात पाणीपुरवठा, विद्युतीकरणासह आवश्यक फर्निचरचाही समावेश आहे.यांतील २६ तलाठी कार्यालये ही मागील वर्षीच मंजूर झालेली असून त्यासाठीचा निधीही यापूर्वीच मंजूर करण्यात आला होता. अशी माहिती साखरखेर्डा येथील मंडळ अधिकारी श्री सोळंके यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
शेतकऱ्यांची अत्यंत महत्वाची अशी कामे या महसूल विभागाशी निगडीत असतात. ज्यात सातबारा, फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले तसेच शासनाच्या विविध अनुदान योजनांची कामे याच कार्यालयामार्फत राबविली जातात. एकंदरीत शेतकरी आणि सामान्य जनतेचा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांशी दररोजचा संबंध येतो. म्हणून शेतकऱ्यांना उपयुक्त कार्यालये उभारण्यात येणार असल्याने जनमाणसात शासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
साखरखेर्डा येथील नवीन महसूल कार्यालयाचे बांधकाम जुन्या चावडीतच करावे: शिवसेना नेते व माजी सरपंच महेंद्र पाटील यांची मागणी
साखरखेर्डा येथील गुजरी चौकात फार जुनी चावडीची ईमारत असून पूर्वी मंडळ अधिकारी आणि दोन्ही विभागाचे तलाठी कार्यालय याच चावडीत होते. विशेष म्हणजे बाजाराचे दिवशी दर शुक्रवारी तहसीलदार, ना.तहसीलदार हे आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह नियमितपणे याच चावडीत येऊन परिसरातील गोरगरीब जनता व शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करायचे. परंतु कालांतराने ही चावडी जर्जर होऊन मोडकळीस आली आणि गावाच्या मध्यभागी असलेले हक्काचे महसूल कार्यालय भाड्याच्या जागेत स्थलांतरीत झाले. तेंव्हापासून ही चावडी ओसाड पडली असून गावाकऱ्यांचे तसेच मंडळ अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांचे ही हाल होत आहेत.
सदरहू चावडीचे नगर भूमापन क्र. १२७२ असून त्याचे क्षेत्रफळ ९६.८० इतके आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाची नवीन इमारत या जागेवर करण्यास कोणतीच अडचण येणार नाही. तसेच गावकऱ्यांच्या दृष्टीनेही ते सोयीचे होईल म्हणून या नवीन इमारतीचे दोनमजली बांधकाम हे जुन्या चावडीच्या जागेवरच करण्यात यावे अशी रास्त मागणी माजी सरपंच तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांनी केली आहे.

Discussion about this post