
यावल-प्रतिनिधी | फिरोज तडवी
यावल तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती प्रक्रियेस गती मिळाली असून, ७ मार्च २०२५ रोजी प्राथमिक गुणांकन यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी दिली.
शासनाच्या नियमानुसार सरळ भरती प्रक्रियेत ३ अंगणवाडी सेविका पदांसाठी २५ अर्ज, तर ४७ मदतनीस पदांसाठी तब्बल ४६४ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी शासनाने नियुक्त केलेल्या पडताळणी समितीच्या मार्गदर्शनाखाली होत असून, उमेदवारांना शासननिर्धारित गुणांकनानुसारच गुण देण्यात येणार आहेत. ७ मार्च रोजी प्रकल्प अधिकारी कार्यालय, पंचायत समिती आणि संबंधित ग्रामपंचायतींच्या बोर्डवर ही यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
कोणत्याही उमेदवाराला यादीतील गुणांकन अथवा निवडीबाबत हरकत असल्यास, ७ मार्च ते २१ मार्च २०२५ या कालावधीत कार्यालयाशी संपर्क साधता येईल. त्यानंतर आलेल्या हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. अर्जदारांची अंतिम गुणवत्ता आणि शासन निकषांनुसार २४ मार्च २०२५ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी स्पष्ट केले की, भरती प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक असेल आणि उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषाला अथवा अफवांना बळी पडू नये. उमेदवारांचे निवडप्रक्रियेत कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे..
Discussion about this post